|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा नगरसेवकांनी केला पंचनामा

प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा नगरसेवकांनी केला पंचनामा 

कुपवाड / वार्ताहर

कुपवाडच्या नगरसेवकांनी प्रभाग बैठकीत प्रशासनाच्या ढिसाळ आणि नियोजनशुन्य कारभाराचा पंचनामा करत साफसफाई, औषध फवारणी, स्ट्रीटलाईट, पाणीपुरवठा, प्रलंबीत विकासकामे आदी विषयावरुन उपायुक्तांसमोर सर्व विभागाच्या अधिकाऱयांना फैलावर घेत खरडपट्टी केली. माणसिकता बदला, कामचुकारपणा टाळा, असा सल्ला देत नगरसेवकांनी कुपवाडला पुर्णवेळ सहा.आयुक्त देवुन विकासकामाला प्राधान्य देण्याची उपायुक्तांकडे मागणी केली.

दरम्यान, बैठक सुरु असतानाच उपमहापौर विजय घाडगे व माजी उपमहापौर प्रशांत पाटील यांच्यात गटार बांधकामाच्या विषयावरुन जोरदार वाद भडकला. प्रशांत पाटील यांच्या वॉर्ड चार व उपमहापौर घाडगे यांच्या वॉर्ड पाचच्या सीमेवर एका पतसंस्थेजवळ घाडगे यांनी काही महिण्यापुर्वी स्वत:च्या फंडातुन गटार बांधुन दिली. परंतु, ती गटार स्थानिक नगरसेवकांना विश्वासात न घेता अर्धवट केल्याचा आरोप पाटील यांनी केल्याने दोघांच्यात जोरदार खडाजंगी झाली. घाडगे यांनी पाटील यांना एकेरी भाषा वापल्याने पाटील चांगलेच संतापले. एकमेकांच्या अंगावर धावुन जाण्याचा प्रकार सर्वासमक्ष घडला. यावेळी धनपाल खोत व गजानन मगदुम यांनी मध्यस्थी करुन वाद मिटवला. तरीही दोघे एकमेकांकडे खुन्नसीने पहात होते. त्य़ामुळे काहीकाळ वातावरण तणावग्रस्त बनले होते. यानिमीत्ताने काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस चव्हाटय़ावर आली.

सभापती सौ.गुलजार पेंढारी यांच्या अध्यक्षतेखाली व उपायुक्त सुनील पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी कुपवाडमध्ये प्रभाग समिती तीनची बैठक झाली. 11.30 वाजता सुरु होणारी सभा उपायुक्त अथवा सहा.आयुक्त उपस्थित नसल्याने बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय नगरसेवकांनी घेतला होता. मात्र, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते यांनी आयुक्तांशी संपर्क साधल्यानंतर आयुक्तांनी उपायुक्त सुनील पवार यांना पाठविण्यात आल्याने सभा सुरळीत पार पडली. एकंदरीत प्रशासनाचे कुपवाडकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे वारंवार दिसुन आल्याने नगरसेवकांनी प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली. यापुर्वीची बैठकही प्रशासनाच्या गैरहजेरीमुळे तहकुब करण्याची वेळ आली होती. प्रभाग बैठकीची माहिती आयुक्तांना न मिळाल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. यावेळी उपमहापौर विजय घाडगे, धनपाल खोत, विष्णु माने, गजानन मगदुम, शेंडजी मोहिते यांनी प्रश्नांचा भडीमार करुन प्रशासनाला घाम फोडला. प्रशासनाने दुर्लक्ष केले तरीही वारंवार बैठका घेवुन सर्व समस्या मार्गी लावण्याचा ध्यास कुपवाडच्या नगरसेवकांनी सर्वानुमते घेतला. उपमहापौर विजय घाडगे, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, नगरसेवक गजानन मगदुम, धनपाल खोत, विष्णु माने, संतोष पाटील, नगरसेविका सुरेखा कांबळे, निर्मला जगदाळे, संगीता खोत यांसह अन्य नगरसेविक उपस्थित होते.

कुपवाडचे सहा.आयुक्त ओंकार उत्पाद यांनी राजीनामा दिल्याने सध्या पद रिक्त आहे. शहराला निर्यण क्षमता असणारे पुर्णवेळ सहा.आयुक्त देण्याची मागणी नगरसेवकांनी केली. पावसाळ्याच्या पार्श्वभुमीवर सर्व सदस्यांनी उपायुक्तांसमोर नागरी समस्या मांडून पावासाळी मुरुमासाठी 25 लाखाची तरतुद करण्याची मागणी केली. उपायुक्तांनी निधीची कमतरता असल्याचे सांगितल्यानंतर उपमहापौर घाडगे यांनी कुपवाडसाठी स्वत:च्या फंडातुन 15 व शेडजी मोहिते यांच्या फंडातुन 10 असा एकुण 25 लाखाचा निधी देण्याची तयारी दर्शवली. त्य़ामुळे सर्व नगरसेवकांनी दोघांचे अभिनंदन केले. यावेळी साफसफाई, औषधफवारणी, स्ट्रीटलाईट दुरुस्ती, प्रलंबीत कामे आदी विषयावरुन नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. कुपवाडला औषध फवारणीसाठी नवीन गाडी खरेदी करण्याचा निर्णय झाला. शहराला 56 नंतर 70 एमएलडी इतक्या पुर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्याबाबतीत योग्य नियोजन करण्याच्या सुचना मांडल्या. आरोग्याच्या प्रश्नावरुन कामचुकार स्वच्छता अधिकारी व कर्मचाऱयांना धारेवर धरण्यात आले. उंचपोल दुरुस्तीसाठी गलेलठ्ठ पगार घेणाऱया वायरमनला प्रशिक्षण देण्याची मागणी विष्णु माने यांनी केली. कनिष्ठ अभियंता दळवी यांचा दुरध्वनी दिवसभर बंद असल्याच्या कारणारवरुन नगरसेवकांनी दळवी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. विकासकामे करण्यासाठी इस्टिमेट करुन मिळत नाही, मग कामे कशी होणार? असा सवाल संगीता खोत यांनी केला. यावेळी विजय घाडगे यांनी त्यांच्या भागातील आदम सय्यद या नागरीकाला नळकनेक्शन नसताता बोगस बील येत असल्याचा मुद्दा मांडुन प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आणला.

Related posts: