|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जिल्हय़ात 20 विद्यार्थी शंभर नंबरी

जिल्हय़ात 20 विद्यार्थी शंभर नंबरी 

दहावी परीक्षेत गुणवत्तेचा नवा विक्रम,

ग्रामीण विद्यार्थ्यांचीही चमक,

कला-संगीत-क्रीडा गुणांचा आधार

प्रतिनिधी /रत्नागिरी

शैक्षणिक प्रवासातील पहिली महत्वाची पायरी मानल्या जाणाऱया दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी जाहीर झाला आहे. या परीक्षेत जिल्हय़ातील शेकडो विद्यार्थ्यांनी अक्षरशः खोऱयाने गुण ओढले आहे. जिल्हय़ात तब्बल 19 विद्यार्थी 100 टक्के गुण मिळवत कोकण बोर्डासह राज्यातही पहिले आले आहे. क्रिडा गुणांबरोबरच संगीत व कला कौशल्यांसाठी देण्यात येणाऱया 25 गुणांचा फायदा मिळवत ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’ फॉम्युर्ल्यावर विद्यार्थ्यांनी हे विक्रमी यश मिळवले आहे.

रत्नागिरी तालुक्यात तब्बल 6 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवले आहेत. यामध्ये पटवर्धन हायस्कूलच्या मुग्धा पोखरणकर व हेमांगी दांडेकर या विद्यार्थीनींचा समावेश आहे. त्याचबरोबर फाटक हायस्कूलच्या तीन विद्यार्थ्यांनीही 100 नंबरी यश मिळवले आहे. यामध्ये अथर्व भिडे, मृदुला देवस्थळी व स्वानंद नेने यांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील पावस हायस्कूलच्या तनुजा मोर्ये हीनेही आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

चिपळुण तालुक्यात शहरी भागातील युनायटेड स्कूलच्या प्रीयाल मेहताला 100 टक्के गुण मिळाले असून ग्रामीण भागातील परशुराम येथील एसपीएम हायस्कूलच्या धनश्री खेडेकर व सृष्टी पाटील तर अलोरे हायस्कूलच्या श्रीया महाडीक यांनीही अशीच कामगिरी केली आहे.

खेड तालुक्यातील ज्ञानदिपच्या सागर माळी व श्रेया घाग यांच्याबरोबरच एलटीटीचा यश सोनवणे यांनीही 100 टक्के यश मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे.

दापोली तालुक्यात ए. जी. हायस्कूलच्या रूचा आठल्ये व निवेदीता परांजपे या दोघींनी तर ज्ञानदिपच्या इशा शिवलकर हिने शभर टक्के यशाची किमया साधली आहे. त्यामुळे तालुक्यातील तिघांना अव्वलतेचा मान मिळाला आहे.

राजपुर तालुक्यातील जानशी हायस्कूलच्या मुक्ताई देसाई व सरस्वती हायस्कूल पाचलच्या साईका पिरजादे या दोघींनीही 100 टक्के गुण मिळवले आहेत. त्याचबरोबर देवरूखच्या दुर्वेश बोडकर यानेही असेच यश मिळवत अव्वलतेचा विक्रम साधला आहे.

कला-संगीत व क्रीडा कौशल्यांमध्ये राज्यस्तरीय यश मिळविणाऱया विदयार्थ्यांना 25 अतिरिक्त गुण दिले जातात. या गुणांचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना मिळाला असून त्यामुळे 100 टक्केची किमया साधता आली आहे. दरम्यान, यावर्षी इतक्या मोठय़ा प्रमाणावर गुणांची टक्केवारी राखत कोकण बोर्डाने नवा विक्रम केला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे ‘तरूण भारत’ परिवाराबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.