|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ‘हालशुगर’ कामगारांचा आक्रमक पवित्रा

‘हालशुगर’ कामगारांचा आक्रमक पवित्रा 

वार्ताहर/ निपाणी

16 जून रोजी होणाऱया संचालक मंडळाच्या बैठकीत कामगारांच्या 30 टक्के वेतन कपातीचा निर्णय तत्काळ मागे घेण्यात येईल. एप्रिल 2017 महिन्याचा थकीत पगार 16 तारखेनंतर चार दिवसात देण्यात येईल, असे लेखी आश्वासन कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी संचालक पप्पू पाटील, अविनाश पाटील, जयवंत कांबळे यांच्यासह माजी उपाध्यक्ष राजू पाटील यांच्या स्वाक्षरीसह कामगार संघटनेला मंगळवार 13 रोजी दिले. पण प्रत्यक्ष कृतीशिवाय माघार नाही असे म्हणत हालशुगर कामगार संघटनेने आपले कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा घेतला.

हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी अधिकारी एम. डी. मल्लूर यांनी जारी केलेल्या नोटिसीनुसार कामगारांचा पगार एप्रिल 2017 पासून 30 टक्के कपात करण्यात आला होता. या निर्णयाने संतापलेल्या कामगार संघटनेने सोमवार 12 रोजी एक दिवसाचे लाक्षणीक कामबंद आंदोलन केले. या आंदोलनातून कोणतेच फलित न मिळाल्याने सोमवारी सायंकाळी कामगार संघटनेने आंदोलन कायम चालू ठेवण्याचा निर्धार करत बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. यानुसार मंगळवारी सकाळपासून सर्व कार्यालये बंद ठेवून आंदोलन सुरू करण्यात आले.

आंदोलन सुरू होताच काही वेळानंतर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. जोशी यांच्यासह संचालकांनी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱयांशी कार्यालयाबाहेरच चर्चा सुरू केली. या चर्चेत प्रा. जोशी यांनी आम्ही कामगारांच्या सोबत आहोत. 16 तारखेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत वेतन कपातीचा निर्णय मागे घेऊ. त्याचप्रमाणे एप्रिल महिन्याचा पगार बैठकीनंतर चार दिवसात देण्याची व्यवस्था करू, अशी ग्वाही दिली. ही ग्वाही देत असताना जर याची पूर्तता झाली नाही तर आपण स्वतः सर्व संचालक मंडळासह कामगारांच्या आंदोलनात सहभागी होऊ, असे सांगितले.

यावर कामगार संघटना पदाधिकाऱयांनी अध्यक्षांचे वाहन बाहेर सोडण्याला अनुमती दिली. त्याचबरोबर लेखी पत्र मागत पत्र तयार करण्यासाठी कार्यालय उघडण्यासाठी संमती दर्शवली. यानंतर अधिकाऱयांनी तयार केलेल्या लेखी आश्वासनाच्या पत्रावर संचालकांसह अध्यक्षांनी स्वाक्षरी करून कामगार संघटनेकडे सदर पत्र सुपूर्द केले.

आंदोलन मागे घेण्याचा अट्टाहास नको

यावेळी प्रा. जोशी यांना दिलेल्या पत्रात, आम्हा कामगारांच्या मागण्यांना यापूर्वी दोन ते तीनवेळा लेखी हमीपत्रे मिळाली आहेत. पण वेळोवेळी प्रत्यक्षात आमच्या पदरात निराशाच पडली आहे. यामुळे आताचे आंदोलन लेखी हमी पत्राच्या आधारावर आंदोलन मागे घेणे योग्य वाटत नाही. हे सर्व समजून घेऊन कामगारांच्यावर होणारा अन्याय थांबावा, योग्य तो न्याय विनाविलंब मिळावा, रितसर लवकर प्रश्न निकालात काढावा, चुकीचा गैरसमज करून न घेता कामबंद आंदोलन मागे घेण्यासाठी अट्टाहास करू नये, अशा आशयाचे पत्र दिले.

संचालक बैठक होईपर्यंत आंदोलन

कारखाना पदाधिकाऱयांनी दिलेल्या पत्राला कामगार संघटनेने लेखी स्वरूपात पत्र देऊन उत्तर दिले आहे. या पत्रातून आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यामुळे हे कामबंद आंदोलन संचालक मंडळाची बैठक होईपर्यंत सुरूच राहणार असे दिसत आहे. कामगार संघटनेच्या पदाधिकाऱयांनी हे कामबंद आंदोलन करताना कारखान्यात असणाऱया अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहणार असल्याचे सांगितले.