|Saturday, August 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ज्ञानी भीष्मांची अवहेलना

ज्ञानी भीष्मांची अवहेलना 

भीष्मांची अवहेलना करत शिशुपाल पुढे म्हणाला- धर्माचे थोडे सुद्धा ज्ञान नसलेला आणि सज्जनांनी चोखाळलेल्या मार्गापासून भ्रष्ट झालेला तू म्हणे धर्मनि÷! आपण धर्मशील आहोत अशी ज्याची खात्री आहे असा कोणता थोर ज्ञानसंपन्न पुरुष, भीष्मा, धर्माचे पालन करण्याचा आव आणणाऱया तू जे कृत्य केलेस तसे कृत्य करील? तुला जर धर्माचे खरोखरच ज्ञान आहे आणि तुझी बुद्धी जर परिपक्व आहे, तर जिने पूर्वीच दुसऱया पुरुषाला मनाने वरले होते अशा अंबा नावाच्या धर्मशील कन्येचा तू अपहार केलासच कसा? धन्य आहे तुझी, भीष्मा! ज्याच्यासाठी तू अंबेचे अपहरण केले होतेस तो तुझा भ्राता विचित्रवीर्य सज्जनांच्या मार्गाचा अवलंब करणारा होता. म्हणून ती अंबा दुसऱयावर अनुरक्त आहे हे समजल्यावर त्यानेही तिची अभिलाषा धरली नाही. आणि स्वतःला मोठा प्रज्ञावंत समजणाऱया तुझ्या डोळय़ांदेखत दुसऱयानेच म्हणजे द्वैपायन व्यासाने सज्जनांनी आचरिलेल्या नियोग मार्गाचा अवलंब करून विचित्रवीर्याच्या भार्यांच्या ठायीं संतती उत्पन्न केली. भीष्मा, यात तुझा धर्म उरला कुठे? अरे, तुझे ब्रह्मचर्य निष्फळ ठरले! तू जे ब्रह्मचर्य पत्करले आहेस ते भ्रांतिष्टपणामुळे तरी असेल, किंवा तू षंढ आहेस म्हणूनही असेल! मला तरी यात कसलीही शंका नाही. धर्मज्ञ भीष्मा, या तुझ्या वर्तनाने तुझी कसलीही प्रति÷ा वाढल्याचे मला दिसत नाही. या सभेत धर्माचे जे तत्त्वज्ञान तू सांगितलेस त्यावरून प्रज्ञावंत धर्मज्ञ वृद्ध पुरुषांची सेवा तू केली नसली पाहिजेस हे उघड आहे.

यजन, दान, अध्ययन, यज्ञ या सर्व गोष्टींना अपत्याच्या सोळय़ाव्या अंशाचीसुद्धा सर नाही. भीष्मा, खडतर व्रतांनी, आणि अनेक उपवासांनी जे साधते ते सारे निपुत्रिकाच्या बाबतीत नि:संशय विफल ठरते. तू अनपत्य आहेस, वृद्ध आहेस आणि खोटय़ा धर्माचे आचरण करीत आहेस. पूर्वापार ऐकलेली एका हंसाची कथा सांगतो, ती नीट ऐक.

फार पूर्वी घडलेली गोष्ट आहे. समुद्राच्या तीरावर एक हंस राहत असे.  ‘अरे, धर्माचे आचरण करा, अधर्माचे आचरण करूं नका!’ असा त्या सत्यवादी हंसाने केलेला उपदेश बाजूला असलेले पक्षी नित्य ऐकत असत. भीष्मा, समुद्रातील इतर काही जलचर पक्षी त्या हंसाला धर्मभावनेने काही भक्ष्य आणून देत असत. इतकेच नव्हे तर, ते जलचर पक्षी आपली सारी अंडी त्या धार्मिक हंसाच्या जवळ आणून ठेवीत आणि काठावर काही वेळ हिंडल्यावर ते पुन्हा समुद्राच्या पाण्यात उडय़ा घेत असत. ते सारे पक्षी त्या हंसावर पूर्ण विश्वास ठेवून अगदी बेसावध असत. पण तो नतद्रष्ट पापी हंस मात्र आपल्या विश्वासघातकी कर्मात अगदी दक्ष राहून त्या पक्ष्यांची थोडी थोडी अंडी खाऊन टाकत असे. असे होता होता अंडी कमी कमी होऊ लागली, तेव्हा काय झाले ते भीष्मा, ऐक.