|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हालशुगर कामगारांचे दुसऱया दिवशीही कामबंद

हालशुगर कामगारांचे दुसऱया दिवशीही कामबंद 

प्रतिनिधी/ निपाणी

30 टक्के वेतन कपातीचा निर्णय मागे घेण्याचे केवळ आश्वासन नको तर प्रत्यक्ष कृती हवी असे म्हणत हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी दुसऱया दिवशीही कामबंद आंदोलन कायम ठेवले. बुधवार 14 रोजीही कारखान्यातील सर्व कार्यालये बंद राहिल्याने त्याचा कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसून आले.

संचालक मंडळाने वेतन कपातीचा घेतलेला निर्णय 16 तारखेच्या बैठकीत मागे घेण्यात येईल. तसेच एप्रिल महिन्याचा पगारही चार दिवसात देऊ, अशी लेखी ग्वाही अध्यक्ष माजी आमदार प्रा. सुभाष जोशी यांनी दिली. मात्र यापूर्वी अनेकदा तोंडी तसेच लेखी आश्वासने देऊनही त्याची पूर्तता संचालक मंडळाने केली नाही. त्यामुळे आश्वासनाऐवजी आधी कृती व मगच आंदोलनातून माघार अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे 16 रोजीच्या बैठकीत वेतन कपातीचा निर्णय घेतल्याशिवाय हे आंदोलन संपणे अशक्य आहे, असे बुधवारच्या परिस्थितीवरुन दिसत होते.

बुधवारी कामगारांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी वाटाघाटी सुरु होत्या. काही मध्यस्थांमार्फत आंदोलन मागे घेण्याचे निरोप येत होते. पण प्रत्यक्ष कृतीवर कामगार ठाम राहिले. गळीत हंगाम जरी बंद असला तरी आंदोलनात कायमस्वरुपी रोजदांरी व हंगामी कामगारही सहभागी आहेत. असे असले तरी कारखान्यातील अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. तसेच पुढील हंगामासाठी वाहतूक करार करण्यात कोणतीही अडचण येऊ नये. यासाठी शेती अधिकाऱयांना सहकार्यासाठी चार कामगार देण्याचा निर्णय कामगारांनी सर्वानुमते घेतला आहे.

दुसऱया दिवशीही चर्चेचे गुऱहाळ कायम

सदर आंदोलनामुळे अन्य कामासह कारखान्यातून होणारी साखर विक्रीही ठप्प झाली आहे. त्यामुळे सभासदांना होणाऱया त्रासाबद्दल कामगारांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. असे असले तरी एक कामगार म्हणून आमच्या मागण्या लक्षात घेऊन सभासदांनी सहकार्य करावे, असे आवाहन कामगार संघटनेतर्फे करण्यात आले आहे. एकूणच बुधवारी आंदोलनाच्या दुसऱया दिवशी चर्चेचे गुऱहाळ कायम ठेवत कारखाना कार्यस्थळावर कामगारांनी ठाण मांडल्याचे दिसून आले.

अन्य कारखान्यात सहावा वेतन आयोग

अन्य कारखान्यात कामगारांसाठी सहावा वेतन आयोग लागू आहे. असे  असताना हालशुगरमध्ये आता केवळ तिसरा वेतन आयोग अस्तित्वात आहे. मात्र कारखान्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन कामगारांनी सहकार्याची भूमिका ठेवली. असे असतानाही 30 टक्के वेतन कपात करण्याचा निर्णय घेऊन कामगारांवर जो अन्याय केला आहे. त्याविरोधात कामगारांचा संताप आहे. यामुळेच कामगारांनी आंदोलनाची भूमिका स्वीकारली आहे.

Related posts: