|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » नोकरीचे आमिष दाखवून पोलिसाच्याच मुलाला गंडवले

नोकरीचे आमिष दाखवून पोलिसाच्याच मुलाला गंडवले 

गुहागरात एटीएम नंबर, पासवर्ड विचारून काढली खात्यातून 35 हजाराची रक्कम

गुहागर / प्रतिनिधी

मोबाईलवरून हजारो रूपयांची नोकरी लावतो, असे येणारे मेसेज हे बोगस असल्याचे पोलीस वारंवार सांगत असतात. तरीही चांगले शिक्षण घेतलेल्या चक्क पोलिसाच्याच मुलाला नोकरीचे आमिष दाखवत 35 हजार 300 रूपयाला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील पोलीस स्थानकात या बाबत संशयितावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केतन प्रदीप भंडारी (23, आबलोली-कोष्टेवाडी) असे फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव आहे. केतन याने दिलेल्या तक्रारीत 18 मे ते 14 जून या कालावधीत 08510981474, 08860031679 या क्रमांकावरून अज्ञाताने फोन करून तुला टाटा कन्स्ट्रक्शन व हिंदुस्थान कन्स्ट्रक्शनमध्ये नोकरी लावतो, असे सांगितले. यासाठी तुझा एटीएम कार्ड नंबर, पासवर्ड तसेच त्यानंतर आलेला ओटीपी नंबर सांग, असे सांगत केतनच्या खात्यातून तब्बल 35 हजार 300 रूपये अज्ञात इसमाने काढले. त्यानंतर त्याचा फोन बंद असल्याने आपली फसवणूक झाल्याचे केतनच्या लक्षात आले. या बाबत गुहागर पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात भादंवि कलम 419, 420, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2008 सुधारणा कलम 66(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रदीप मिसर करत आहेत.