|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » पुणे » भक्तीच्या वर्षावात तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान

भक्तीच्या वर्षावात तुकोबांच्या पालखीचे प्रस्थान 

ऊन-सावल्यांच्या खेळात रंगल्या फुगडय़ा :  अत्यंत भक्तिरसपूर्ण वातावरणात वारकऱयांचा उत्साह टीपेला

पुणे / प्रतिनिधी

संपदा सोहळा नावडे मनाला ।

लागला टकळा । पंढरीचा ।।

या अभंगाचे स्मरण… टाळ मृदुंगाचा निनाद…. तुकोबा-तुकोबा नामाचा अखंड गजर… अन् मनी विठुरायाच्या भेटीची आस… अशा अत्यंत भक्तिरसपूर्ण वातावरणात संतशिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीने शुक्रवारी दुपारी साडेचारच्या सुमारास देहहून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.

कपाळावर बुक्का, गळय़ात तुळशीच्या माळा, हातात टाळ, खांद्यावर पताका, मुखी विठ्ठलनामाचा जप अन् मनी सावळय़ा विठ्ठलाच्या भेटीची आंतरिक ओढ ठेऊन श्रीक्षेत्र देहूत वैष्णवांची मांदीयाळी पवित्र इंद्रायणीकाठी एकवटलेली. त्यांच्या साक्षीनेच पालखी पंढरीच्या वाटेकडे मार्गस्थ झाली. तुकोबारायांचा आत्मिक लळा अन् पांडुरंग भेटीची आस लागलेल्या वारकऱयांनी भक्तिसागरात चिंब होत विठुरायाकडे सुखसमृद्धी आणि पावसाचे मागणे मागितले. आषाढवारीच्या या 332 व्या भक्तीप्रवाहात अडीच लाख भाविक सहभागी झाले आहेत.

पहाटे घंटानादाने अवघा गाव जागा झाला. तेव्हापासूनच इंद्रायणीच्या डोहात आनंदाचे तरंग उमटत होते. परंपरेनुसार प्रस्थान सोहळय़ास पहाटे पाच वाजता प्रारंभ झाला. संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात महापूजा झाली. त्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची महापूजा पारंपरिक दिंडीच्या मानकऱयांच्या हस्ते झाली. पहाटे साडेपाच वाजता वैकुंठस्थान मंदिरात श्री तुकाराम महाराजांची तसेच पालखी सोहळय़ाचे जनक श्री नारायणमहाराज समाधीची महापूजा करण्यात आली. सकाळी दहा वाजता संभाजीमहाराज देहूकर यांनी ‘उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दहिभात’ हे पालखी सोहळा सप्ताह काल्याचे कीर्तन केले. तुकोबांच्या आजोळघरी इनामदारवाडय़ात पाद्यपूजा, गणेशपूजा, वरुणपूजा आणि कलशपूजा करण्यात आली. इनामदारवाडय़ात कारभारी आणि वारकऱयांच्या हस्ते पादुकापूजन झाले. परंपरेनुसार पादुका म्हसलेकर मंडळींच्या ताब्यात देण्यात आल्या. वारकऱयांनी त्या वाजतगाजत मुख्य मंदिरातील भजनी मंडपात आणल्या. 

दुपारी अडीच वाजता पालखी प्रस्थान सोहळय़ास प्रारंभ झाला. रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या पालखीतील पादुकांची पूजा बीड येथील ज्येष्ठ वारकऱयांच्या हस्ते करण्यात आली. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी सपत्नीक पूजा केली. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, विलास लांडे, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या पत्नी गिरीजा बापट आदी उपस्थित होते. त्यानंतर चोपदार देशमुख, चोपदार देहूकर, चोपदार कळमकर या मानकऱयांसह दीडशे वीणेकऱयांचा, दिंडीप्रमुखांचा नारळप्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास ‘पुंडलिक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम’ आणि ’ज्ञानोबा-तुकोबा’चा जयघोष करीत देहूगावातील युवा वारकऱयांनी तुकाराम महाराजांच्या पादुका पालखीत ठेवत पालखी खांद्यावर घेतली. यावेळी शंख, नगारा, ताशांचा गजर झाला.

भजनी मंडपातून पालखी बाहेर येताच दिंडय़ांमध्ये उत्साह संचारला. वीणा झंकारल्या, मृदंगाचा स्वर टिपेला पोहोचला, वारकऱयांची पावले थिरकली. ऊन- सावल्यांच्या खेळात फुगडय़ा रंगल्या. निसर्गानेही यात रंग भरले. आभाळात जणू मेघनृत्य पाहायला मिळाले. वारकऱयांच्या डोळय़ात, मनातच नव्हे तर अवघ्या आसमंतात जणू विठ्ठल भरून राहिला. चांदीची अब्दागिरी, छत्रचामर, गरुडटक्के, पुण्याचे बाभूळगावकर यांचा मानाचा अश्व आणि अकलूजचे प्रतापसिंह मोहिते- पाटील यांचा अश्व अशा थाटात पालखीची देऊळवाडय़ाभोवती प्रदक्षिणा सुरु झाली. सायंकाळी साडेचार वाजता मोठय़ा भक्तिमय वातावरणात पालखी मुख्य मंदिराबाहेर पडली. सायंकाळी देहू परिसरात पाऊसही झाला.

332 दिंडय़ांचा सहभाग

यंदाच्या सोहळय़ात राज्याच्या कानाकोपऱयातून 332 दिंडय़ा सहभागी झाल्या आहेत. पालखी मार्गस्थ झाल्यावर वाटेतच असंख्य भाविक सोहळय़ात सहभागी होणार आहेत. मंदिर प्रदक्षिणेनंतर प्रथेप्रमाणे पालखी वाजतगाजत आजोळघरी मुक्कामाला गेली. तेथे म्हातारबुवा खणेपुरीकर यांचे दिंडीचे कीर्तन झाले. शनिवारी पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करणार असून सायंकाळी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात विसावणार आहे.

वारकऱयांची संख्या रोडावली

पालखी सोहळय़ात राज्याच्या कानाकोपऱयातून लाखो भाविक सहभागी झाले आहेत. मात्र, खोळंबलेल्या पेरण्या, शेतकरी संप आणि पावसाची दडी यामुळे वारकऱयांची संख्या कमी झाली आहे. तर वाटेत भाविक मोठय़ा संख्येने सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

माउलींच्या पालखीचे आज प्रस्थान

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे शनिवारी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. प्रस्थान सोहळय़ासाठी लाखो वारकऱयांची पावले अलंकापुरीकडे वळली आहेत.

Related posts: