|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पुनर्वसनप्रश्नी महसूलला आली उशिरा जाग

पुनर्वसनप्रश्नी महसूलला आली उशिरा जाग 

कापसाळ येथील जागेची केली तडकाफडकी पाहणी

आठ दिवसात जागा ताब्यात घेणार

पुनर्वसन खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे कामही सुरू

प्रतिनिधी /चिपळूण

गेल्या वर्षभरपासून गोवळकोट-कदम बौध्दवाडीतील 15 कुटुंबियांच्या पुनर्वसनाविषयी दुर्लक्ष करणाऱया महसूलला ऐन पावसात अखेर जाग आली आहे. कापसाळ येथील नियोजित जागेवर पुनर्वसन करण्यासाठी शनिवारी तहसीलदारांनी जागेची पाहणी केली. तसेच 8 दिवसात पाटबंधारे विभागाकडील ही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच पुनर्वसनाच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच ते मान्यतेसाठी शासनाकडे सादर केले जाणार आहे.

गोवळकोट-कदम-बौद्धवाडी येथील पंधरा व मोहल्ल्यातील अन्य कुटुबियांच्या घराला कुलूप ठोकून सील करण्यात आले आहे. त्यामुळे वर्षभरात हे कुटुंबिय घराकडे फिरकले देखील नाहीत. मात्र ज्या ठिकाणी या कुटुंबियांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे त्या गोवळकोट जिल्हा परिषद शाळेची अत्यंत दयनीय अवस्था बनली आहे. या शाळेला जागोजागी गळती असल्याने तसेच शाळेचे बांधकामही ढासळू लागले असल्याने येथे राहणे धोकादायक बनले आहे. त्यातच इमारतीत पावसामुळे कायम ओलावा रहात असल्याने आजारांनाही समोर जावे लागत आहे. अशा परिस्थितीत शासनाने मात्र या कुटुंबियांच्या पुनर्वसनाच्या विषयाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. याविषयी ‘तरूण भारत’ने आवाज उठवून ‘पुनर्वसनाची प्रशासनाने चालवलेय चेष्टा’ असे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर याविषयी तहसीलदार जीवन देसाई यांनी शनिवारी तडकाफडकी कापसाळ येथील जागेची पाहणी केली.

याविषयी तहसीलदार देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, पुनर्वसनासाठी कापसाळ येथील पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेली 98 गुंठे जागा निश्चित करण्यात आली असून या जागेत सुमारे 30 कुटुंबियांच्या पुनर्वसनाची तयारी सुरू आहे. येत्या 8 दिवसात ही जागा महसूलच्या नावे करण्यात येणार असून पुनर्वसनासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच ते शासन मान्यतेसाठी पाठवले जाणार आहे. ही जागा शहरालगत असल्याने पुनर्वसनासाठी या जागेची निवड करण्यात आली आहे. या जागेपासून काही अंतरावर मराठी शाळा व कामथे उपजिल्हा रूग्णालय आहे. याशिवाय महामार्गापासून अवघ्या 100 फुटावर ही जागा आहे. एकूण सर्व सोयीसुविधांनी असलेली ही जागा पुनर्वसनासाठी योग्य आहे. तरीदेखील कुटुंबियांचा गोवळकोटमध्येच पुनर्वसन करण्याची मागणी असल्याचेही देसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी मंडल अधिकारी जाधव, महावितरणचे अधिकारी पाटील हेही उपस्थित होते.

नुसतीच आश्वासने दिली जाताहेतः विजय कदम

पुनर्वसनाच्या विषयात सुरूवातीपासूनच नुसती आश्वासने दिली जात आहेत. आतापर्यंत जे निर्णय झाले ते परस्पर घेण्यात आले. जिल्हाधिकाऱयांसमोर ग्रामस्थांना नेले, मात्र जराही बोलू दिले नाही. कापसाळ येथेच पुनर्वसन होईल, असा दबाव टाकला जात आहे. प्रत्यक्षात ही जागा अद्यापही ताब्यात घेण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाकडून पुनर्वसनाच्या विषयात पूर्णपणे धूळफेक सुरू असून गेल्या वर्षभरात तलाठी व पोलीस पाटीलदेखील आमच्याकडे फिरकलेला नाही. वर्षभर जिल्हा परिषदेच्या शाळेत आम्ही कसेबसे दिवस काढले असून अधिकाऱयांनी अशा ठिकाणी एक दिवस तरी राहून दाखवावे, अशी संतप्त प्रतिक्रियाही विजय कदम यांनी व्यक्त केली.

आजारांचा करावा लागतोय सामनाः उषा कदम

गोवळकोट शाळेच्या इमारतीला जागोजागी गळती असून पाऊस सुरू झाल्यानंतर भिंतीतून झऱयाप्रमाणे पाणी पाझरते. त्यामुळे भिंतीचे बांधकामही ढासळू लागले आहे. याशिवाय पाण्यामुळे कायम ओलावा रहात असून त्यापासून काहींना आजारही होत आहेत. काविळ, टायफाईडसारख्या आजारांनाही समोर जावे लागत आहे. त्याचा त्रास या कुटुंबियांमधील अनेकांना झाला असून काहीजण भाडय़ाने खोल्या घेऊन रहात आहेत. प्रशासनाच्या चुकीमुळेच ही वेळ आली असल्याची प्रतिक्रिया उषा कदम यांनी व्यक्त केली.

गोवळकोट गाव सोडणार नाहीः सिद्धार्थ कदम

पुनर्वसनाच्या जागेचा शासनाने अद्यापही प्रश्न सोडवलेला नाही. गोवळकोट गावात असलेल्या शासकीय जागा पूररेषेखाली असल्याचे कारण सांगितले जाते. प्रत्यक्षात असा कोणताही अद्यादेश शासनाने पुढे आणलेला नाही. याशिवाय पूररेषेखाली अनेक बाधकामे आजही सुरू आहेत. त्यांना परवानगी दिली जाते, मग आमची त्या जागेत का व्यवस्था केली जात नाही? याशिवाय उर्वरित शासकीय जागांवर अतिक्रमण झाले असताना त्याविषयी आम्ही बोलायचे नाही का? असे सवाल उपस्थित करून सिद्धार्थ कदम यांनी वेळीच ठोस निर्णय झाला नाही तर आम्ही गोवळकोट गाव सोडून जाणार नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Related posts: