|Tuesday, March 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » …तर 1 जुलैपासून धान्य पुरवठा बंद

…तर 1 जुलैपासून धान्य पुरवठा बंद 

संगमेश्वर तालुका पुरवठा विभागात आधार लिंकच्या कामाला वेग

30 जूनपर्यंत आधार क्रमांक देण्याचे आवाहन

प्रतिनिधी /देवरुख

तालुक्यात आता रेशन दुकानात पॉस मशिनव्दारे धान्य वाटप होणार आहे. मात्र यासाठी आधार क्रमांक देणे गरजेचे आहे. अजूनही तालुक्यातील अनेक शिधापत्रिकाधारकांनी हा क्रमांक दिलेला नाही. हा क्रमांक देण्याची 30 जूनपर्यंत मुदत असून न दिल्यास 1 जुलैपासून संबंधितांचा अन्नधान्य पुरवठा बंद करण्यात येणार असल्याची माहिती तालुका पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.

अन्नधान्य पुरवठय़ात पारदर्शकता यावी, यासाठी शासनाने पॉस मशिनव्दारे रेशन दुकानावर शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तालुक्यात याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. तालुक्यात 132 रेशन दुकाने आहेत. सध्या तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात शिधापत्रिकाधारकांची माहिती भरण्याचे काम सुरु आहे. शिधापत्रिकेत ज्या व्यक्तांची नावे आहेत. त्यांचे आधारकार्ड क्रमांक संबंधित साईटवर लोड केले जात आहेत.

धान्य पुरवठय़ात येणार पारदर्शकता

बायोमेट्रीक पध्दतीचा अवलंब करुन हे धान्य वितरण केले जाणार आहे. यासाठी लाभार्थ्याने धान्य घेताना मशिनला अंगठा लावणे बंधनकारक आहे. यामुळे शिधापत्रिकेवर ज्यांची नावे आहेत, त्या व्यतिरिक्त अन्य कुणालाही याचा लाभ मिळणार नाही. यामध्ये धान्य पुरवठय़ात पारदर्शकता येणार आहे. तसेच रेशन दुकानाच्या कारभारातही सुसूत्रता येणार आहे.

तालुक्यात एकूण 54 हजार 176 शिधापत्रिकाधारक आहेत. त्यापैकी 10 हजार शिधापत्रिकाधारकांचे आधार लिंकचे काम पूर्ण झाले आहे. साधारणतः 30 जूनपर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे. तालुक्यात अजूनही अनेक शिधापत्रिकाधारकांनी आधार क्रमांक संबंधित रेशन दुकानदाराकडे जमा केलेला नाही. यामुळे या आधार लिंकच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे.

रेशन दुकानदारांकडे आधारकार्ड क्रमांक जमा करण्याची 15 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र शासनाने त्यामध्ये आता वाढ करुन ती 30 जूनपर्यंत केली आहे. या मुदतीत आधार क्रमांक दिला नाही तर संबंधित शिधापत्रिकाधारकाचा धान्य पुरवठा बंद करण्यात येणार आहे. साधारणतः 1 जुलैपासून ही कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे. तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांनी दिलेल्या मुदतीत आधार

क्रमांक जमा करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार संदीप कदम यांनी केले आहे.

Related posts: