|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कोच्चि मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण

कोच्चि मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण 

केरळमधील पहिली मेट्रो सेवा : वॉटर मेट्रोचीही सुविधा, कर्मचारीवर्गात ट्रान्सजेंडर्सना स्थान

वृत्तसंस्था/ कोच्चि

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोच्चि येथे केरळच्या पहिल्या मेट्रो टेनचे अनावरण केले आहे. त्यांनी पलारिवट्टम ते पथादिपल्लम स्थानकादरम्यान मेट्रोने प्रवास देखील केला. ऑगस्ट महिन्यापासून ही मेट्रो सेवा जनतेसाठी खुली केली जाणार आहे. अनावरण कार्यक्रमात ई.श्रीधरन देखील उपस्थित राहिले. आधी त्यांचे नाव यादीत नसल्याने विरोधकांनी टीका केली होती.

कोच्चि देशातील पहिले शहर असेल, जेथे वॉटर मेट्रो असणार आहे. यांतर्गत शहराच्या 10 आयलँड्सना बोट वाहतुकीद्वारे जोडले जाईल. प्रवाशांना मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचविण्यासाठी ही व्यवस्था उभारली जात आहे. वॉटर मेट्रोवर 819 कोटी रुपये खर्च होणार असून ही सेवा 2018 पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. कोच्चि मेट्रोने कर्मचारी वर्गात ट्रान्सजेंडर्सना स्थान दिले असून पहिल्या टप्प्यात 3 जणांचा समावेश करण्यात आला आहे.

मोठय़ा प्रमाणावर सौर ऊर्जेचा वापर होणारी ही देशातील पहिली मेट्रो आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर याच्या सर्व स्थानकांच्या छतावर सौरघट लावले जातील. गरजेच्या 25 टक्के वीज सौरऊर्जेद्वारे प्राप्त करण्याची कोच्चि मेट्रोची योजना आहे.

संपर्कव्यवस्था आधारित नियंत्रण

या मेट्रो सेवेत कम्युनिकेशन आधारित ट्रेन कंट्रोल तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. फ्रिक्वेंसी वाढविणे आणि त्रुटी कमी करण्याच्या उद्देशाने असे केले जात असून याचा वापर करणारी ही देशातील पहिलीच मेट्रो सेवा आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर ही देशातील पहिली मेट्रो सेवा असेल, ज्यात 80 टक्के महिला कर्मचारी असतील.

अत्यंत कमी वेळेत पूर्ण

कोच्चि मेट्रो सेवा सुरू होण्यास फक्त 45 महिने लागले असून देशाच्या इतर मेट्रो सेवांच्या तुलनेत ही सर्वात कमी वेळेत सुरू झाली आहे. मुंबई मेट्रोची पहिली 11 किलोमीटरची सेवा सुरू करण्यास 75 महिने लागले होते. चेन्नई मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला 72 महिने, जयपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला 56 महिने, तर दिल्ली आणि बेंगळूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्यासाठी 50-50 महिने लागले होते.

13 किलोमीटरचा मार्ग

कोच्चि मेट्रो प्रकल्पाचे काम 2012 साली सुरू झाले होते. तत्कालीन ओमन चंडी सरकारने याची जबाबदारी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनला सोपविली होती. या कंपनीचे मुख्य सल्लागार ई. श्रीधरन यांनी या प्रकल्पाचे निरीक्षण केले होते. पहिल्या टप्प्यात ही ट्रेन पलारिवट्टोम आणि अलुवादरम्यान 13 किलोमीटरचे अंतर कापणार आहे. उर्वरित स्थानकांवर सध्या काम सुरू आहे.

किमान तिकीट 15 रुपये

कोच्चि मेट्रोच्या प्रत्येक डब्यात मोबाईल चार्जिंगसाठी युएसव्ही पोर्ट असेल. याचे  किमान तिकीट 15 रुपये असून अलुवा ते पलारिवोट्टमदरम्यानच्या 13 किलोमीटरच्या अंतरासाठी 30 रुपये आकारले जातील.