|Friday, July 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » थारच्या वाळवंटात सरस्वती नदीचा शोध सुरू

थारच्या वाळवंटात सरस्वती नदीचा शोध सुरू 

122 ठिकाणी होणार उत्खनन : केंद्रीय भूजल बोर्डाकडे जबाबदारी, नदीच्या अस्तित्वाचे मिळाले पुरावे

वृत्तसंस्था/ जोधपूर

 थारच्या वाळवंटात पुन्हा एकदा सरस्वती नदीचा शोध सुरू झाला आहे. केंद्रीय भूजल बोर्ड नदीच्या शोधासाठी 122 ठिकाणी उत्खनन करणार आहे. या ठिकाणांची निवड पटविण्यात आली आहे. ऋग्वेद आणि महाभारत सारख्या ग्रंथांमध्ये सरस्वती नदीचा उल्लेख असून प्रयागात देखील गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगम असल्याचे मानले जाते. धार्मिक मान्यतांमध्ये सरस्वती नदीला गंगेसमान पवित्र मानले जाते.

सध्या काहीही सांगणे घाईचे ठरेल, जैसलमेरमध्ये खोदण्यात आलेल्या टय़ूबवेल्समध्ये मोठय़ा प्रमाणात पाणी मिळाले आहे, चौकशीत तेथील पाणी हजारो वर्षे जुने आढळले होते. नव्या प्रकल्पांतर्गत याच तपासणीला पुढे नेले जात आहे. नव्या ठिकाणी उत्खनन करून पाण्याची तपासणी केली जाईल असे बोर्डाचे वरिष्ठ संशोधक रामकिशन चौधरी यांनी सांगितले.

अधिक खोलीवर पाणी सातत्याने भरले जात आहे. या भागातील पाण्याची पातळी कमी होताना दिसत नसून हा निश्चितच संशोधनाचा विषय आहे. एक्यूफर मॅचिंग मॅप तयार करण्यासाठी केंद्र सरकारने 122 ठिकाणांवर नवे टय़ूबवेल खोदण्याचा निर्णय घेतला आहे. यांतर्गत सरस्वती नदीच्या प्रवाहवाल्या भागात उत्खनन होईल असे चौधरी म्हणाले.

संशोधनाचा आधार

थारच्या वाळवंटात ताज्या पाण्याचा कोणताही स्रोत नाही. जैसलमेरमध्ये अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडतो, तरीही येथे अनेक ठिकाणी 50-60 मीटरवरच भूजल मिळते.

पाण्याचा दाब अधिक

केंद्रीय भूजल बोर्डाने थारच्या वाळवंटात काही ठिकाणी टय़ूबवेलची खोदाई केली. येथून पाणी बाहेर काढले आणि याचा दाब एवढा अधिक आहे की मोटार न लावतच पाणी पृष्ठभागावर येत आहे.

विहिरी आटतच नाही

ज्या भागात भूजल बोर्डाने खोदाई केली, तेथील विहिरींमधील पाणी कधीच आटत नाही. यात ट्रायटियम देखील नसल्याने ते मॉडर्न रिचार्जद्वारे आले नसल्याचे स्पष्ट होते.

हजारो वर्षांपूर्वीचे भूजल

या भागांमध्ये अनेक वैज्ञानिक विश्लेषण झाले आहे. आयसोटोप विश्लेषणामुळे येथील वाळूच्या टेकडय़ांखाली पाणी असल्याचे समजते. रेडिओ कार्बन डाटाद्वारे देखील येथे हजारो वर्षांपूर्वीचे भूजल असल्याचा संकेत मिळतो

प्रत्येक विहिरीतील पाण्यात समानता

वैज्ञानिकांनुसार सरस्वती नदीचा जो भाग मानण्यात आला आहे, तेथील विहिरींमधील पाण्यांच्या नमुन्यांमध्ये समानता आढळली आहे. दुसरीकडे नदीचा भाग वगळता इतरत्र असणाऱया विहिरींमधील पाण्याचे गुणधर्म वेगळे दिसून आले आहेत.

असा होणार शोध

येथील काही भागांमध्ये पाणी एवढय़ा अधिक प्रमाणात आहे की, निरंतर उपशानंतर देखील ते संपत नाही, या स्थितीत सरस्वती नदीचे या भागात अस्तित्व असू शकते असे म्हटले जाऊ शकते. केंद्रीय बोर्ड भूजलाचे वयोमान शोधून काढणार आहे. केंद्र सरकार नदीच्या शोधासाठी बाडमेर-जैसलमेरमध्ये 122 टय़ूबवेल खोदेल.