|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वागदेत महामार्गावरच कार पेटली

वागदेत महामार्गावरच कार पेटली 

कणकवली : कणकवलीहून ओरोसच्या दिशेने जाणारी कार वागदे येथे आली असतानाच अचानक पेटली. वागदे-टेंबवाडी येथील सावंत-भोसले कॉलनीनजीक शनिवारी सायंकाळी 4.45 वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर घटनास्थळी दाखल झालेल्या न. पं. च्या अग्निशमन बंबाच्या सहाय्याने सुमारे पाऊण तासानंतर आग विझविण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत कार आगीत जळून खाक झाली होती.

ही कार कणकवलीहून ओरोसच्या दिशेने जात होती. कारमध्ये तिघेजण प्रवास करीत होते. कार वागदे-टेंबवाडी येथील सावंत-भोसले कॉलनजीक आली असता कारमधून अचानक धूर येऊ लागला. प्रसंगावधान राखून कारमधील तिघेही खाली उतरले. त्यानंतर काही क्षणातच कारने पेट घेतला.

कार आगीच्या भक्ष्यस्थानी

कारने पेट घेल्याचे समजताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत संपूर्ण कारच आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. त्यामुळे ग्रामस्थही काहीच करू शकत नव्हते. आगीच्या उंच ज्वाळा दिसत होत्या. उपस्थितांपैकी कुणीतरी संपर्क साधल्यानंतर न. पं. चा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन बंबाच्या जवानांची पाऊण तासाच्या परिश्रमाअंती आग विझविण्यात आली. मात्र, तोपर्यंत संपूर्ण कार जळून खाक झाली होती. आगीमध्ये कारचे टायर, आतील सीट, तसेच कारमधील साहित्य जळून खाक झाले होते. काचाही निखळून पडल्या होत्या. हेडलाईट, इंडिकेटरसह पूर्ण कार बेचिराख झाली होती.

महामार्गावर वाहतूक खोळंबली

जळालेली कार ऐन महामार्गावर असल्याने महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आग विझविल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. या घटनेची सायंकाळी उशिरापर्यंत कणकवली पोलीस स्थानकात नोंद नसली तरी कार कणकवली येथील नारळाचे व्यापारी श्री. वाळके यांची असल्याची माहिती त्यांनी दिली.

Related posts: