|Thursday, May 24, 2018
You are here: Home » क्रिडा » भारत-पाकिस्तान यांच्यात आज ‘दुहेरी महायुद्ध’!

भारत-पाकिस्तान यांच्यात आज ‘दुहेरी महायुद्ध’! 

क्रिकेटमध्ये दोन्ही संघ चॅम्पियन्स जेतेपदासाठी आमनेसामने,

हॉकीत एचडब्ल्यूएल सेमीफायनल्समध्येही झुंज रंगणार

वृत्तसंस्था/ लंडन

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत व सर्फराज अहमदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा संघ आज (दि. 18) आयसीसी चॅम्पियन्स चषक जेतेपदासाठी आमनेसामने भिडणार असून याचवेळी हॉकी वर्ल्ड लीगमध्येही हेच दोन्ही संघ एकमेकांविरोधात दंड थोपटणार असल्याने कोटय़वधी क्रीडाप्रेमींसाठी आज खऱया अर्थाने सुपरसंडे अनुभवता येणार आहे. क्रिकेटमधील महायुद्धाला दुपारी 3 वाजता तर हॉकीमधील महायुद्धाला सायंकाळी 6.30 वाजता प्रारंभ होईल. या दोन्ही लढतींचे चाहत्यांना आतापासूनच वेध लागलेले आहेत.

क्रिकेट

क्रिकेटमध्ये यंदा आयसीसी चॅम्पियन्स चषकाचे जेतेपद कायम राखणे, हा विराटसेनेचा सर्वोच्च प्राधान्यक्रम असेल. या आवृत्तीत भारताने लंकेविरुद्धच्या लढतीचा अपवाद वगळता अन्य सर्व सामन्यांमध्ये अगदी स्वप्नवत पराक्रम गाजवत थाटात फायनलमध्ये ‘एन्ट्री’ मारली. येथे सलामीच्या लढतीतच त्यांनी याच पाकिस्तानी संघाला अक्षरशः लोळवले असल्याने विराटसेनेचे मनोबल अर्थातच उंचावलेले असणार आहे. डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने ती लढत तब्बल 124 धावांनी जिंकली होती.

पुढे दुसऱया साखळी सामन्यात भारताला लंकेकडून पराभवाचा धक्का जरुर बसला. मात्र, तिसऱया व शेवटच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा धोबीपछाड करत भारताने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. शिवाय, उपांत्य फेरीत आपल्याच तोऱयात वावरणाऱया बांगलादेशला देखील जमिनीवर आणण्याचे कर्तव्य इमानेइतबारे पार पाडले. आता आज होणाऱया अंतिम लढतीत पाकिस्तानचा पुन्हा एकदा धुव्वा उडवत चॅम्पियन्स जेतेपदावर आपली मोहोर उमटवायची, याच निर्धाराने विराटसेना ओव्हलमधील केनिंग्टन क्रिकेट स्टेडियमवर उतरेल.

हॉकी

Hockey World League Semi Final LOGO

इंग्लिश भूमीतच सुरु असलेल्या हॉकी वर्ल्ड लीग (एचडब्ल्यूएल) उपांत्य स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान हेच दोन दिग्गज संघ झुंजणार आहेत. या हॉकी स्पर्धेतील सलामीच्या लढतीत भारतीय हॉकी संघाने स्कॉटलंडचा 4-1 अशा एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला. त्यानंतर शनिवारी या संघाची लढत कॅनडाविरुद्ध झाली असून आज (दि. 18) ते पाकिस्तानविरुद्ध झुंजणार आहेत.

जागतिक हॉकीमध्ये सध्या भारतीय संघ 6 व्या स्थानी असून याचवेळी पाकिस्तानचा संघ 13 व्या स्थानी आहे. या ‘सेमीफायनल्स’ स्पर्धेतून पात्र ठरणारे संघ भुवनेश्वर येथे होणाऱया हॉकी वर्ल्ड लीग (एचडब्ल्यूएल) फायनल्स स्पर्धेत खेळतील.

दोन-तीन दशकांपूर्वीचा इतिहास नजरेखालून घातला तर क्रिकेटपेक्षाही हॉकीच्या मैदानात उभय संघात अधिक चुरस रंगायची, असे दिसून आले. पण, नंतर हॉकीत तो जोश राहिला नव्हता. आता मात्र दोन्ही देशातील हॉकीतही जान भरली गेली असल्याने आजचे उभय संघातील हॉकीतील दुसरे महायुद्धही विशेष रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. एकाच राष्ट्रीय जर्सीच्या माध्यमातून खेळणाऱया या दोन्ही क्रीडा प्रकारातील संघ येथे दणकेबाज विजय संपादन करुन देतील, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान

क्रिकेट

आयसीसी चॅम्पियन्स चषक फायनल

ठिकाण : ओव्हल, लंडन

वेळ : दुपारी 3 पासून

 

हॉकी

हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनल्स स्पर्धा

ठिकाण : लंडन

वेळ : सायं. 6.30 वा.

क्रिकेटच्या महायुद्धावर 2 हजार कोटींचा सट्टा

तंत्रज्ञानाच्या मदतीने तसेच ब्रिटनमध्ये जुगार, सट्टय़ाला अधिकृत मान्यता असल्याने या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट महायुद्धासाठी तब्बल 2 हजार कोटी रुपयांचा सट्टा लागला असल्याचा अंदाज ऑल इंडिया गेमिंग फेडरेशनने नोंदवला आहे. बुकीजनी या लढतीसाठी अगदी किंचीत फरकाने भारताच्या पारडय़ात मत नोंदवले आहे. मात्र, यातील फरक अगदीच नगण्य आहे. भारत जिंकेल, यासाठी 100 रुपयाचा सट्टा लावल्यास विराटसेनेच्या विजयानंतर 147 रुपये मिळतील आणि पाकिस्तानच्या बाजूने सट्टा असल्यास त्यांचा संघ विजयी झाल्यास 300 रुपये मिळतील, असा होरा आहे. भारत वर्षभरात खेळत असलेल्या सर्व सामन्यांमध्ये साधारणपणे 2 लाख कोटी रुपयांचा सट्टा लावला जातो, असे गेमिंग फेडरेशनचे सीईओ रोलँड लँडर्स यांनी म्हटले आहे.

Related posts: