|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » नगराध्यक्षपदी सुनिता पोळ निश्चित

नगराध्यक्षपदी सुनिता पोळ निश्चित 

प्रतिनिधी/ कराड

मलकापूर (ता. कराड) नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी आगाशिवनगर येथील नगरसेविका सुनिता पोळ यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. शनिवारी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी सत्ताधारी काँग्रेसकडून एकच अर्ज दाखल झाला. पोळ यांचा अर्ज छाननीत वैध ठरला असून निवडीची औपचारिक घोषणा 21 जून रोजी होणार आहे.

मलकापूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी अडीच वर्षांसाठी खुल्या महिला वर्गाचे आरक्षण पडले होते. पहिल्या सव्वा वर्षांसाठी काँग्रेसचे नेते मनोहर शिंदे यांचे विश्वासू नारायण रैनाक यांच्या पत्नी कल्पना रैनाक यांना संधी मिळाली. रैनाक यांनी नगराध्यक्षपद सांभाळताना महिला सक्षमीकरणासह सांडपाणी प्रक्रिया योजना पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला. काँग्रेस आघाडीचे प्रमुख मनोहर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहरात सर्वच विभागात वृक्षारोपणासह स्वच्छ व सुंदर मलकापूर अभियान राबवण्यासाठी त्यांनी हातभार लावला. सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर कल्पना रैनाक यांनी आपल्या पदाचा राजीनामा गत आठवडय़ात जिल्हाधिकाऱयांकडे सोपवला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला. सत्ताधारी गटाकडून आगाशिवनगर विभागाला संधी देण्याचा निर्णय झाला. नगरसेविका सुनिता पोळ यांचे नाव निश्चित झाले. शनिवारी पोळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. याप्रसंगी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, मोहनराव शिंगाडे, शंकरराव चांदे, मावळत्या नगराध्यक्षा कल्पना रैनाक यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

पीठासन अधिकारी हिम्मतराव खराडे, मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आला. अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत पोळ यांचाच अर्ज आला. त्यानंतर अर्जाची छाननी करण्यात आली. पोळ यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरल्याचे पीठासन अधिकाऱयांनी सांगितले. नगराध्यक्षपदासाठी पोळ यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड निश्चित झाली.

उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे म्हणाले, मलकापूरच्या विकासात आगाशिवनगरच्या नागरिकांनी नेहमीच सकारात्मक हातभार लावला आहे, असे सांगितले.

Related posts: