|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » उपोषण करून पावसकरांचा आंदोलनास पाठिंबा

उपोषण करून पावसकरांचा आंदोलनास पाठिंबा 

वार्ताहर/ कराड

मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या विरोधात गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या कर्मचाऱयांच्या आंदोलनाला पाठिंबा देत ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनीही एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. कर्मचाऱयांच्या काम बंद आंदोलनामुळे सहाव्या दिवशीही पालिकेचा कारभार ठप्प राहिल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याकडून मानसिक त्रास होत असून प्रशासनाने तातडीने त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी, या मागणीसाठी पालिकेतील राष्ट्रवादी कर्मचारी संघटनेच्या तीन कर्मचाऱयांनी गेल्या सहा दिवसांपासून पालिकेसमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत पालिकेतील अन्य 350 कर्मचाऱयांनीही सोमवार 12 पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत औंधकर यांची बदली होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा कर्मचाऱयांनी दिला आहे. यामुळे गेली सहा दिवसांपासून पालिकेचा कारभार ठप्प आहे. याचा फटका शहरातील नागरिक व विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारीही आंदोलनात सहभागी असल्याने शहरात कचऱयाचे साम्राज्य पसरले आहे. संपात असतानाही शुक्रवारी एक दिवस कर्मचाऱयांनी रस्त्यावरील कचरा उचलण्याचे काम केले. मात्र, शनिवारी पुन्हा सर्वत्र कचऱयाचे ढीग दिसत आहेत. शनिवारी ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांनी पाठिंबा देत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. तर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील, आरोग्य समितीचे सभापती विजय वाटेगावकर, बांधकाम सभापती बाळासाहेब यादव, तुषार खराडे, प्रितम यादव, निशांत ढेकळे, सुरेश पाटील, विनोद भोसले, सुदर्शन पाटसकर यांनी उपोषणस्थळी भेट देत कर्मचाऱयांची विचारपूस केली.

या आंदोलनास अनेक संघटना व सामाजिक संस्थांच्यावतीने पाठिंबा देण्यात येत आहे. यामध्ये भाजपा, श्रीकृष्ण नाटय़ मंडळ, श्रीकृष्ण महिला मंडळ, लिबर्टी मजदूर मंडळ, श्री सुत दैवज्ञ समाज संस्था, एन्व्हायरो नेचर प्रेंडस् क्लब, विठ्ठल गणेश मंडळ, जोशी समाज, कराड व पाटण तालुका भटक्या विमुक्त संघटना, डवरी समाज आदी संस्थांच्यावतीने पाठिंबा देण्यात आला.

तसेच मुख्याधिकारी विरूद्ध नगरसेवक व कर्मचारी वादावर तातडीने तोडगा काढून आंदोलन थांबवण्याबाबतचे निवेदन डॉ. गिरीष देशपांडे यांनी प्रांताधिकारी यांना दिले आहे. निवेदनात, कर्मचाऱयांच्या आंदोलनामुळे शहरातील कचऱयाची समस्या बिकट होत आहे, असे सांगितले.  यावेळी सिकंदर पटेल, जावेद इनामदार, प्रसाद देशमुख, विशाल उकिरडे, ऍड. खैरतखान हे उपस्थित होते.

Related posts: