|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त भर देणार

राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त भर देणार 

 

प्रतिनिधी/ पणजी

“येत्या 5 वर्षांच्या कार्यकाळात गोव्यामध्ये शिवसेना राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त भर देणार आहे. राजकीय विषयांपेक्षा सामाजिक कार्यामध्ये पुढे येण्यास आमचे प्राधान्य असेल. राजकारणात न पडता गोव्यातील भूमीपुत्रांचे प्रश्न, युवकांना रोजगार व जनतेच्या स्वाभिमानाच्या मुद्यांवर शिवसेना कार्य करणार आहे’’ असे प्रतिपादन करताना राज्यात आलेले शिवसेनेचे महाराष्ट्रातील प्रवक्ते व प्रमुख नेते तथा खासदार संजय राऊत यांनी करताना शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.

 पणजीतील शिवसेनेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या एका सर्वसाधारण कार्यक्रमामध्ये युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जितेश कामत, इशिता तिवारी व इरफान खान यांनी शिवसेनेमध्ये औपचारिकरीत्या प्रवेश केला.

 

यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये खासदार राऊत यांच्यासह नव्याने पक्षात प्रवेश केलेले जितेश कामत, प्रवक्त्या राखी नाईक, शिवसेना गोवा अध्यक्ष शिवप्रसाद जोशी व उपाध्यक्ष मायकल कारास्को व्यासपीठावर उपस्थित होते. इरफान खान यांच्यासोबत त्यांच्याबरोबर युवक काँग्रेसमध्ये कार्य केलेले त्यांचे बरेच कार्यकर्तेही यावेळी उपस्थित होते. यावेळी जितेश कामत, इशिता तिवारी व इरफान खान यांचा राऊत यांनी शिवसेना पक्षाची पारंपरिक शाल घालून त्यांना औपचारिकरित्या पक्षात प्रवेश दिला.

सामाजिक कार्याला प्राधान्य देऊ  

गोव्यामध्ये शिवसेना राजकारणामध्ये न पडता सामाजिक कार्याला जास्त प्राधान्य देणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे गोवा राज्यातील काम हे प्रामुख्याने गोमंतकीय जनतेच्या स्वाभिमानासाठी व राज्यातील युवकांच्या रोजगार व इतर समस्या सोडविण्याविषयी असेल, असे राऊत म्हणाले. त्याचप्रमाणे जितेश कामत व राखी नाईक पक्षाचे प्रवक्ते या नात्याने कार्य करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. शिवसेना समाजातील सर्व घटकांसाठी, खासकरून युवकांसाठी व सर्व धर्मांमधील लोकांसाठी काम करणार असल्याचे राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले.  

 

शिवसेना मुस्लीमविरोधी नाही, बीफबंदी हा राष्ट्रीय स्तरावरील मुद्दा  

शिवसेना हा पक्ष मुस्लीमविरोधी नाही तर पाकिस्तानहून येऊन देशामध्ये अराजकता माजविणाऱया घटकांविरूध्द आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे महाराष्ट्रातील अनेक नेते हे मुस्लीम असल्याचे राऊत यांनी सांगितले. आमचा लढा हा मुस्लीमांच्या विरोधात नाही, तर दाऊद इब्राहीम आणि अबू सालेम यांच्यासारख्या दुष्ट प्रवृत्तींच्या विरोधात आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे सध्या गाजणाऱया बीफबंदीच्या विषयाबाबत बोलताना बीफबंदी हा राष्ट्रीय स्तरावरील विषय अथवा मुद्दा असल्याने गोव्यामध्ये अशा विषयावर चर्चा होणे योग्य नाही, अथवा होऊ नये असे राऊत म्हणाले. त्याचप्रमाणे गोव्यामध्ये हिंदी चित्रपटांसह कोकणी व मराठी चित्रपटांचे प्रदर्शनही व्हावे, अशी भूमिका त्यांनी घेतली. कोकणी व मराठी राज्यातील स्थानिक भाषा असल्याने व त्यांना मातृभाषेचा दर्जा असल्याने या भाषांमधील चित्रपटांनाही प्रोत्साहन हवे असे मत राऊत यांनी मांडले. जीतेश कामत यांनी बोलताना शिवसेनेमुळे युवकांना प्रोत्साहन मिळत असून युवक काँग्रेसमध्ये असताना जसे उत्साहाने काम केले तसेच आता शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर करणार असल्याचे ते म्हणाले. इरफान खान यांनी आपल्याला युवावर्गासाठी काम करण्याची इच्छा असल्याचे मनोगत व्यक्त केले. 

उद्धव ठाकरे जुलैमध्ये गोव्यात 

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे येत्या जुलै महिन्यामध्ये पक्षाचे कार्य पुढे नेण्यासंदर्भातल्या कार्यासाठी गोव्यामध्ये येणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे ही महाराष्ट्रातील महान व्यक्तिमत्वे असल्याने महाराष्ट्रात येणाऱया कुणालाही त्यांच्यासमोर झुकावेच लागेल. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे त्यांच्यापुढे नतमस्तक होणे यात मोठे विशेष असे काहीच नसल्याचे राऊत यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.    

Related posts: