|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » क्रांतिदिनाचे स्फूरण जागवून बदल घडवा

क्रांतिदिनाचे स्फूरण जागवून बदल घडवा 

प्रतिनिधी/ फोंडा

18 जून या क्रांतिदिनाचे स्फूरण लक्षात घेऊन कचरामुक्त व वाईट प्रवृत्तीला थारा देऊ नका. क्रांतीचे महत्त्व जाणा व ते आचरणात आणा. राज्यातील क्रांतीवीरांचा इतिहास युवा पिढीला अवगत करण्यासाठी आपण प्रयत्नरत राहणार आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यानी केले. सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत सदर फेंडा येथील क्रांती मैदानाच्या सौंदर्यीकरण करण्यात आलेल्या प्रकल्पाच्या  उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर नगरनियोजन मंत्री ऍड. फ्रान्सिस डिसोझा, सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, फोंडय़ाचे आमदार रवी नाईक, सावर्डेचे आमदार दीपक पाऊसकर, नगराध्यक्ष डॉ. राधिका नाईक, मुख्याधिकारी नवनाथ नाईक, मुख्य सचिव धर्मेश शर्मा, स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग कुंकळय़ेकर, बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर, पी. सी. गुप्ता तसेच पालिकेचे नगरसेवक उपस्थित होते.

मतभेद विसरून फोंडय़ाच्या विकासासाठी झटा : पर्रीकर

बांधकाम मंत्री, फोंडय़ाचे आमदार व पालिका मंडळ या त्रयीनी मतभेद विसरून फोंडय़ाच्या विकासासाठी एकत्रित काम करावे, असा सल्ला दिला. या प्रकल्पाची भविष्यात योग्य प्रकारे दुरुस्ती करणार याचे आश्वासन पालिकेने द्यावे. त्यानंतरच खढांती मैदानाचा ताबा पालिकेच्या स्वाधीन करू, असे आश्वासन दिले. क्रांती मैदानाच्या खुल्या जागेत सुमारे दीड हजार लोकांची आसनव्यवस्था व एकंदरित काम उच्च दर्जाचे झाल्याचे कौतुकास्पद उद्गार पर्रीकर यानी यावेळी काढले.

हुतात्म्यांचे प्राणार्पण कायमचे लक्षात ठेवावे : मंत्री सुदिन ढवळीकर

  231 स्वातंत्र्यसैनिकांची आठवण व हुतात्म्यांचे प्राणार्पण कायमचे फोंडेकराच्या लक्षात राहावे या एकमात्र उद्देशाने टीकाकारांच्या विरोधाला न जुमानता पांतीमैदानाचे काम पूर्णत्वास नेणे याला प्राथमिकता दिली, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले. सरकारने स्वातंत्र्यसैनिकांच्या सुमारे 140 जणाची नावे या प्रकल्पातील खांबावर कोरण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर ते पालिकेच्या सुपूर्द करू, अशी ग्वाही दिली. फोंडा शहराच्या विकासासाठी वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर तोडगा, मलनिस्सारण प्रकल्प यासारख्या आपण पुढाकार घेण्यास तयार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

नगर नियोजन मंत्री ऍड. फ्रान्सिस डिसोझा यानी बोलताना क्रांतीवीरामुळे हुकुमशाहीच्या तावडीतून मुक्त होऊन आज आपण लोकशाहीत नांदत असल्याचे सांगताना त्याचे त्याग व बलिदान विसरू नये असे सांगितले. स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग कुंकळय़ेकर यानी विचार मांडताना आपले सहकारी हुतात्मा चंद्रकांत केरकर यांनी क्रांती मैदानासाठी शर्थीचे प्रयत्न केल्याचा उल्लेख केला. रवी नाईक यांनी या क्रांती मैदानाचा इतिहास कथन केला. राधिका नाईक यांनीही यावेळी विचार मांडले.

क्रांती मैदानाचे उद्घाटन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याहस्ते फित कापून करण्यात आले. त्यानंतर हुतात्मा स्मारकावर पुष्प वाहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्वातंत्र्यसैनिकांच्याहस्ते पाषाणी स्तंभावर कोरलेल्या हुतात्म्याच्या कार्याची महती सांगणाऱया ताम्रपाटीचे अनावरण करण्यात आले. यावेळी क्रांती मैदानावर असलेले कंदबकालीन सिंह व प्रवेशद्वारावर असलेले पाण्याचे कारंजे सर्वांचे लक्ष वेधत होते.

 उद्घाटन समारंभानंतर झालेल्या कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत अभियंते उत्तम पार्सेकर यानी केले.

 

नगराध्यक्ष राधिका नाईक यांना काळे बावटे

नगराध्यक्ष राधिका नाईक यांच्यामुळे या प्रकल्पाला विलंब झाला या कारणामुळे त्याना व्यासपीठावर बसण्यास विरोध असल्याचा इशारा देणाऱया फलकासह काळे बावटे दाखवत काही नागरिकांनी निषेध केला.

 

स्वातंत्र्यसैनिकांची माहिती देणारे पाषाणी स्तंभ

यावेळी प्रभाकर दुलो नाईक, कृष्णा वासुदेव परब, लक्ष्मण नारायण वेलिंगकर, के घनश्याम, कामिलु जुझे परेरा, सुरेश अनंत केरकर, तुळशीदास काशिनाथ कामत, कमलाकांत गंगाराम काणेकर, कालिदास गोसावी, प्रभाकर लक्ष्मण वेरेकर या हुतात्म्यांची नावे येथील खांबावर कायमस्वरुपी ताम्रपटावर कोरण्यात आली आहेत.

Related posts: