|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » अर्जुन साळगावकर यांच्या कार्यालयावर एसआयटीचा छापा

अर्जुन साळगावकर यांच्या कार्यालयावर एसआयटीचा छापा 

प्रतिनिधी/ पणजी
खाण घोटाळा प्रकरणात गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) शनिवारी खाणमालक अर्जुन साळगावकर यांच्या कार्यालयावर छापा टाकला. आल्तिनो पणजी येथील साळगावकर यांच्या कार्यालयात संध्याकाळी उशिरापर्यंत तपासकाम सुरु होते.
शनिवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास एसआयटीचे पोलीस अर्जुन साळगावकर यांच्या आल्तिनो कार्यालयात पोचले होते. साळगावकर यांच्या मालकीच्या खाणी संदर्भातील कागदपत्रे तसेच इतर काही महत्त्वाची कागदपत्रे तपासण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. साळगांवकर मायनिंग प्रा. लि. कंपनीचे संचालक मुकेश सगलानी व इतर अधिकाऱयांसमक्ष कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. 2005 ते 2012 दरम्यान उत्खनन केलेले खनिज, निर्यात केलेले खनिज, तसेच कंपनीकडे आलेला पैसा याबाबतच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. खाण संदर्भातील कागदपत्रे तसेच कंपनीच्या नावे असलेली इतर व आयकरबाबत कागदपत्रे तपासण्यात आली. रात्री उशिरांपर्यंत तपासकाम सुरु होते.
खाण मालक अर्जुन साळगावकर यांना एसआयटीने काही दिवसांपूर्वी समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी अर्जुन साळगावकर चौकशीला उपस्थित राहिले होते. मात्र चौकशी दरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. नंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. खाण घोटाळय़ात चौकशीला सामोरे जाताना एसआयटी अधिकाऱयांकडून अटक करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अर्जुन साळगावकर यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. भ्रष्टाचार प्रतिबंधक न्यायालयाने अर्जावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे अटकपर्व जामीनावरील सुनावणी होईपर्यंत साळगावकर यांना एसआयटीकडून अटक होण्याची भीती नाही.
एसआयटीने खाण घोटाळा प्रकरणात नव्याने तपासकाम सुरु केल्यानंतर अनेक खाण कंपन्यांच्या मालकांना तसेच त्यांच्या संचालकाना समन्स बजावून चौकशीला बोलावले होते. यापैकी काही खाण मालक तसेच खाण कंपनींचे संचालक चैकशीला हजर राहिले. काहीजणांनी अटक होण्याच्या भीतीने अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.