|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » चिकोडीसह परिसरात पावसाचा ‘श्रीगणेशा’

चिकोडीसह परिसरात पावसाचा ‘श्रीगणेशा’ 

प्रतिनिधी/ चिकोडी

गेल्या वर्षातील दुष्काळ, वळीव पावसाने फिरविलेली पाठ व मान्सूनच्या आगमनाला झालेला विलंब यामुळे चिकोडीसह परिसरातील चिंता व्यक्त होत होती. प्रत्येकजण आभाळाकडे डोळे लावून बसला होता. शनिवारी दुपारी परिसरात पावसाने हजेरी लावत श्रीगणेशा केला.

शनिवारी सकाळपासून वातावरणात प्रचंड उष्णता निर्माण झाली होती. कडाक्याचे उन्ह पडल्याने जून महिन्यातही मे हिटचा अनुभव घ्यावा लागत होता. अशा वातावरणामुळे मान्सूनचे आगमन होणार कधी? याची चिंता सर्वांच्या मनात वाढली होती. याचवेळी ढगाळ वातावरण होताना पाऊस पडण्याला पूरक स्थिती निर्माण झाली. दुपारी 3 वाजता पावसाला सुरुवात झाली. सुमारे 1 तास पावसाने झोडपून काढले. पावसाला सुरुवात होताच नागरिक, शाळकरी मुले यांची एकच तारंबळ उडाली. यातून गर्दीने बहरलेले रस्ते निर्मनुष्य बनले. पादचारी व दुचाकीस्वारांनी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेत पावसापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. लहान मुले या पहिल्या वहिल्या पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद घेताना दिसत होते.

पेरणीपूर्व कामांना पूरक वातावरण

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या पावसामुळे सर्वानाच सुखावून सोडले. खरीप पेरणी पावसाविना लांबत होत्या. कृषी संघात उपलब्ध बियाणे विक्रीविना पडून होते. पावसाच्या चिंचेतून सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. पण शनिवारी झालेला पाऊस हा आशा देणारा ठरला आहे. आता पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला पूरक वातावरण निर्माण झाले आहे. असे असले तरी पेरणीसाठी मोठय़ा पावसाची गरज व्यक्त होत आहे.

संकेश्वर, एकसंबा परिसरात जोरदार पाऊस

  संकेश्वर : शनिवारी दुपारी संकेश्वर व हुक्केरी परिसरात पावसाने दमदार हजेरील लावल्याने परिसरातील नागरिक व शेतकरी सुखावल्याचे दिसून आले. गत महिन्यात पावसाने किरकोळ हजेरी लावल्याने शेतकऱयांनी जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज बांधला होता. पण तसे न झाल्याने हताश झालेला बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला होता शनिवारच्या पावसाने शेतकऱयाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.  दुपारी 1 च्या दरम्यान झालेल्या जोरदार पावसाने रस्ते व गटारीतून पाणीच पाणी वाहत होते. पावसामुळे नागरिकांची व्यापाऱयांची तारांबळ उडाली होती.  आजच्या पावसाने गत काही दिवसांपासून थांबलेल्या शेतीकामांना गती मिळणार आहे. 

                    हुक्केरीत पाऊस

 हुक्केरीत पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी बांधवात आनंदाचे वातावरण पसरले आहे. आजचा पाऊस चांगला झाल्याने शेतकऱयांना पेरणीचे वेध लागले आहे. गत पंधरा दिवसापूर्वी हुक्केरीत मोठा पाऊस झाला होता त्यानंतर दांडी मारलेल्या पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला होता. 

एकसंब्यात पावसाची दमदार हजेरी

एकसंबा : एकसंबासह परिसरात दुपारी सुमारे एकतास पडलेल्या पावसाने  परिसरातील अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकरी खूश झाला आहे. पावसाचा अंदाज बांधत परिसरातील काही शेतकऱयांनी खरीप  पेरणीची तयारी केली होती. पण पावसाने दडी मारल्याने शेतकऱयाचे डोळे आभाळाकडे लागून राहिले होते. आजच्या पावसाने शेतकऱयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.  आजचा पाऊस परिसरात केवळ  4 किलो परिसरातच बरसला. उर्वरित ठिकाणी किरकोळ पाऊस झाला.

Related posts: