|Thursday, May 24, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » इटगी येथे भरदिवसा दोन ठिकाणी घरफोडी

इटगी येथे भरदिवसा दोन ठिकाणी घरफोडी 

प्रतिनिधी/ खानापूर

तालुक्मयातील इटगी गावात दोन ठिकाणच्या घराचे कुलूप फोडून चोरांनी 20 तोळे सोन्याचे दागिने तसेच 40 हजार रोख रक्कम पळविण्याची घटना शुक्रवारी भरदिवसा घडली.

इटगी गावातील सुरेश हुंचीनमनी यांच्या घराचे कुलूप तोडून तिजोरी फोडून त्यामधील 13 तोळे सोन्याचे दागिने व 40 हजार रु. पळविले. सुरेश हुंचीनमनी हे चिक्कमन्नोळी येथील कानडी शाळेत शिक्षक आहेत. यामुळे ते शाळेत गेले होते. तर त्यांची मुलेही घराला कुलूप लावून शाळेला गेली होती. दुपारी 1 वाजता त्यांचा एक मुलगा नेहमीप्रमाणे शाळेतून घरी परतला. त्यावेळी घराचे कुलूप तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घरातील कपाटही उघडय़ा अवस्थेत असल्याचे पाहिले. याची कल्पना त्यांनी वडिलांना देताच तेही शाळेतून घरी आले. त्यांनी त्वरित नंदगड पोलिसांना घटनेची माहिती दिली.

दुसरी घटना इटगी क्रॉस येथे राहणारे महेश हिरेमठ यांच्या घरात घडली. तेही शिक्षक असल्याने नेहमीप्रमाणे शाळेला गेले होते. तर त्यांची पत्नी बाजाराला गेली होती. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते. चोरांनी नेमकी हीच संधी साधून त्यांच्याही घरचे कुलूप फोडून सात तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. त्यांची पत्नी बाजार करून घरी परतली. त्यावेळी घराचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आले. घर उघडून पाहिले असता कपाटही उघडे होते व सोन्याचे दागिनेही गायब झाले होते.

या दोन्ही घटनेची माहिती समजताच खानापूरचे पोलीस निरीक्षक गुरुनाथ तसेच नंदगडचे पोलिस निरीक्षक यु. एस. आवटी व त्यांचे सहकारी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही चोरीचे प्रकार पाहून अधिक तपासासाठी बेळगावहून श्वानपथक तसेच ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. काही वेळातच श्वानही आले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. ठसे तज्ञानी मात्र आपले काम केले. या दोन चोरीच्या घटनांमुळे इटगी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Related posts: