|Thursday, May 24, 2018
You are here: Home » क्रिडा » भारताच्या पराभवात हार्दिकची एकाकी झुंज

भारताच्या पराभवात हार्दिकची एकाकी झुंज 

आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेत पाकिस्तान विजेता,

वृत्तसंस्था/ लंडन

प्रचंड आशाअपेक्षांचे ओझे घेऊन ओव्हल स्टेडियमवर उतरणारा भारतीय संघ आयसीसी चॅम्पियन्स चषकाच्या फायनलमध्ये सपशेल ढेपाळला आणि कोटय़वधी क्रिकेटप्रेमींची अक्षरशः निराशा झाली. शतकवीर फकहर झामनच्या आक्रमक शतकाच्या बळावर 50 षटकात 4 बाद 338 धावांचा डोंगर रचणाऱया पाकिस्तानने भारताचा डाव 30.3 षटकात अवघ्या 158 धावांमध्येच खुर्दा करत या स्पर्धेचे पहिले जेतेपद थाटात संपादन केले. एकापेक्षा एक मातब्बर भारतीय फलंदाज स्वस्तात गारद होत असताना हार्दिक पंडय़ाने सातव्या स्थानी फलंदाजीला येत 43 चेंडूत 76 धावांची खेळी साकारली, ते भारताच्या डावातील एकमेव वैशिष्टय़ ठरले. 1992 च्या विश्वचषकानंतर पाकने जिंकलेली ही पहिलीच आयसीसी स्पर्धा आहे.

वास्तविक, पाकिस्तानने आपल्या गोलंदाजांचा समाचार घेतला, यात नावीन्य काहीच नव्हते. पण, विराटसेनेतील एकापेक्षा एक मातब्बर फलंदाजांनी ज्या पद्धतीने हाराकिरी केली, ते तमाम भारतीय चाहत्यांसाठी अधिक क्लेषदायी ठरले. विजयासाठी 339 धावांचे खडतर आव्हान असताना रोहित शर्मा (0), विराट कोहली (5), धोनी (4), शिखर धवन (21) व युवराज सिंग (22) आल्या पावलीच निघून गेले आणि त्यानंतर भारताचा पराभव होणार ही काळय़ा दगडावरची रेघ होती. पुढे पंडय़ाच्या आक्रमक खेळीच्या बळावर अशक्यप्राय विजयाची स्वप्ने पाहिली जात होती. पण, जडेजाच्या चुकीमुळे पंडय़ाला धावचीत व्हावे लागले आणि त्यानंतर उरलीसुरली आशाही संपुष्टात आली.

केदार जाधव 9 तर रवींद्र जडेजा 15 धावांवर बाद झाले. पुढे, रविचंद्रन अश्विन (1), जसप्रीत बुमराह (1) जणू मैदानावर हजेरी लावण्यापुरते आले आणि भुवनेश्वर एका धावेवर नाबाद राहिला. पाकिस्तानतर्फे मोहम्मद आमीर (3/16) व हसन अली (3/19) यांनी प्रत्येकी 3 फलंदाज गारद करत भारताच्या आव्हानातील हवाच काढून घेतली.

जीवदानानंतरही विराट पुढील चेंडूवरच तंबूत

प्रारंभी, विजयासाठी 338 धावांचे खडतर आव्हान असताना रोहित शर्मा शून्यावर बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीकडून संघर्षपूर्ण फलंदाजीची अपेक्षा होती. पण, विराटने ती सपशेल फोल ठरवली. मोहम्मद आमीरच्या डावातील तिसऱया षटकात एकदा जीवदान लाभल्यानंतरही विराटने त्यापासून जणू काहीच बोध घेतला नाही आणि पुढील चेंडूवरच तो झेलबाद होत तंबूत परतला. या षटकात प्रारंभी तिसऱया चेंडूवर पहिल्या स्लीपमध्ये अझहर अलीने त्याचा झेल सोडला होता. पण, लगोलग चौथ्या चेंडूवरही विराटचा फटका चुकला आणि चेंडू बॅटची कड घेऊन थेट पॉईंटवरील शदाब खानकडे गेला. त्याने तो अचूक टिपला.

फकहर झामनचे तडफदार शतक

या लढतीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला पाचारण केल्यानंतर पाकिस्तानने या संधीचा पुरेपूर लाभ घेतला. अझहर अली (71 चेंडूत 6 चौकार, 1 षटकारासह 59) व शतकवीर फकहर यांनी 23 षटकात 128 धावांची सलामी देत प्रारंभी भक्कम पाया रचला होता. त्यावर बाबर आझम (52 चेंडूत 46), मोहम्मद हाफीज (37 चेंडूत नाबाद 57) यांनी कळस चढवला. इमाद वासिम 21 चेंडूत 25 धावांवर नाबाद राहिला. भारतीय गोलंदाजांनी तब्बल 25 अवांतर धावा देत आणखी एक आश्चर्याचा धक्का दिला.

धावफलक

पाकिस्तान : अझहर अली धावचीत (बुमराह-धोनी) 59 (71 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), फकहर झामन झे. जडेजा, गो. पंडय़ा 114 (106 चेंडूत 12 चौकार, 3 षटकार), बाबर आझम झे. युवराज, गो. केदार जाधव 46 (52 चेंडूत 4 चौकार), शोएब मलिक झे. जाधव, गो. भुवनेश्वर 12 (16 चेंडू), मोहम्मद हाफीज नाबाद 57 (37 चेंडूत 4 चौकार, 3 षटकार), इमाद वासिम नाबाद 25 (21 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार). अवांतर 25. एकूण 50 षटकात 4 बाद 338.

गडी बाद होण्याचा क्रम

1-128 (अझहर अली, 22.6 षटके), 2-200 (फकहर, 33.1), 3-247 (शोएब मलिक, 39.4), 4-267 (बाबर आझम, 42.3).

गोलंदाजी

भुवनेश्वर कुमार 10-2-44-1, जसप्रीत बुमराह 9-0-68-0, रविचंद्रन अश्विन 10-0-70-0, हार्दिक पंडय़ा 10-0-53-1, रवींद्र जडेजा 8-0-67-0, केदार जाधव 3-0-27-1.

भारत : रोहित शर्मा पायचीत गो. मोहम्मद आमीर 0 (3 चेंडू), शिखर धवन झे. सर्फराज, गो. मोहम्मद आमीर 21 (22 चेंडूत 4 चौकार), विराट कोहली झे. शदाब खान, गो. आमीर 5 (9 चेंडू), युवराज सिंग पायचीत गो. शदाब  22 (31 चेंडूत 4 चौकार), महेंद्रसिंग धोनी झे. इमाद, गो. हसन अली 4, केदार जाधव झे. सर्फराज, गो. शदाब 9 (13 चेंडूत 2 चौकार), हार्दिक पंडय़ा धावचीत (मोहम्मद हाफीज-हसन अली) 76 (43 चेंडूत 4 चौकार, 6 षटकार), रवींद्र जडेजा झे. आझम, गो. जुनेद खान 15 (26 चेंडू), अश्विन झे. सर्फराज, गो. हसन अली 1 (3 चेंडू), भुवनेश्वर कुमार नाबाद 1 (8 चेंडू), जसप्रीत बुमराह झे. सर्फराज, गो. हसन अली 1. अवांतर 3. एकूण 30.3 षटकात सर्वबाद 158.

गडी बाद होण्याचा क्रम

1-0 (रोहित, 0.3 षटके), 2-6 (विराट, 2.4), 3-33 (धवन, 8.6), 4-54 (युवराज, 12.6), 5-54 (धोनी, 13.3), 6-72 (केदार जाधव, 16.6), 7-152 (पंडय़ा, 26.3), 8-156 (जडेजा, 27.3), 9-156 (अश्विन, 28.1), 10-158 (बुमराह, 30.3).

गोलंदाजी

मोहम्मद आमीर 6-2-16-3, जुनेद खान 6-1-20-1, मोहम्मद हाफीज 1-0-13ö0, हसन अली 6.3-1-19-3, शदाब खान 7-0-60-2, इमाद वासिम 0.3-0-3-0, फकहर झामन 3.3-0-25-0.

त्या नोबॉलमुळे अवघ्या भारतीयांची निराशा!

कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीला पाचारण केल्यानंतर चौथ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर प्रतिस्पर्ध्यांना जबरदस्त धक्का बसला होता. बुमराहच्या बाहेर जाणाऱया चेंडूला छेडण्याच्या प्रयत्नात फकहर झामनने यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीकडे यावेळी अतिशय सोपा झेल दिला. धोनी-विराटसह अन्य सहकाऱयांनी जोरदार सिलेब्रेशनही केले. पण, याचवेळी मैदानी पंचांनी नोबॉल आहे का, हे जाणून घेण्यासाठी तिसऱया पंचांचे सहकार्य घेतले, त्यावेळी बुमराहकडून ओव्हरस्टेपिंग झाल्याचा धक्कादायक खुलासा झाला. या नोबॉलमुळे भारताची संधी तर हुकलीच. शिवाय, दुसरीकडे फकहरला आपला डाव पुढे सुरु ठेवता आला. या जीवदानाचा पुरेपूर लाभ घेत फकहरने तडफदार, आक्रमक शतक झळकावत भारताच्या या जखमेवर आणखी मीठ चोळले. त्याचे हे पहिलेच वनडे शतक आहे. बुमराहच्या नोबॉलवर जीवदान मिळाले, त्यावेळी फकहर अवघ्या 8 चेंडूत 3 धावांवर खेळत होता.

पंडय़ा लढला आणि जडेजाच्या ‘त्या’ चुकीवर पस्तावला!

रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, युवराज, धोनीसारखे जागतिक स्तरावरील एकापेक्षा एक मातब्बर फलंदाज स्वस्तात गारद होत असताना सातव्या स्थानी फलंदाजीला उतरलेल्या हार्दिक पंडय़ाने अवघ्या 43 चेंडूत 76 धावांची धमाकेदार खेळी साकारली. या त्याच्या तडफदार खेळीत 4 चौकार व तब्बल 6 उत्तुंग षटकारांचा देखील समावेश राहिला. मात्र, डावातील 27 व्या षटकात एकेरी धाव चोरण्याच्या प्रयत्नात जडेजाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने पंडय़ाला धावचीत होत तंबूत परतावे लागले आणि आपली निराशा त्याने अजिबात लपवली नाही. वास्तविक, पंडय़ाने कॉल दिला आणि ती धाव पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, जडेजाने पंडय़ा अर्ध्या टप्प्यापर्यंत परतल्याचे पाहिल्यानंतरही क्रीझच सोडले नाही आणि एकाकी झुंजणाऱया पंडय़ाची आणखी निराशा झाली.

Related posts: