|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मान्सून थबकल्याने बळीराजा चिंतेत

मान्सून थबकल्याने बळीराजा चिंतेत 

प्रतिनिधी/ सांगली

जिल्हय़ात गेल्या आठवडय़ात दमदार पावसाची एंट्री झाली होती. त्यामुळे बळीराजा खुशीत होता. या बळीराजाने तातडीने पेरण्याला प्रारंभ केला पण गेल्या तीन-चार दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने खरिपाच्या पेरण्या थांबल्या आहेत. जिल्हय़ात अवघ्या 15 ते 20 टक्के पेरण्या झाल्या आहेत. जिल्हय़ात पावसाची लवकर शक्यता दिसत नसल्याने बळीराजा चिंतेत अडकला आहे. जिल्हय़ात तिसऱया आठवडय़ात सरासरी 40 टक्के इतक्या पेरण्या होणे अपेक्षित आहे. जोपर्यंत पावसाला पुन्हा प्रारंभ होत नाही तोपर्यंत या पेरण्या खोळंबणार आहेत.

जिल्हय़ात एकूण तीन लाख 90 हजार हेक्टर क्षेत्र हे खरीप पिकाखाली आहे. यावर्षी सरासरी पाऊसमान होणार असल्यो बळीराजा खुशीत होता. गेल्या आठवडय़ात जिल्हय़ात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने खरिपाच्या पेरणीलाही चांगलाच वेग आला होता. अनेक गावात पेरण्या सुरूही झाल्या होत्या. पण शनिवारपासून पुन्हा एकदा पावसाने उघडीप दिल्याने या पेरण्याची कामे पूर्णपणे थांबली आहेत. देशात सरासरी इतका पाऊसमान होणार असल्याने कृषि विभागाने खताचे आणि बियाणांचे योग्य असे नियोजन केले आहे. या नियोजनानुसार जिल्हय़ात एकूण सात हजार 655 क्ंिवटल बियाणांची विक्री झाली आहे. तर खताची 10 हजार 950 टन इतकी विक्री झाली आहे.

पीकनिहाय सोमवारपर्यंत झालेली पेरणी

जिल्हय़ात ज्वारीची पेरणी फक्त सात टक्के, बाजरीची पेरणी 23 टक्के मक्याची पेरणी 14 टक्के तुर दहा टक्के, उडीद 14 टक्के मूग 9 टक्के, भुईमूग 20 टक्के  भात 80 टक्के असे सरासरी एकूण 15 ते 20 टक्के पेरणी जिल्हय़ात झाली आहे. पण  ही पेरणी दोन दिवसापूर्वीची आहे. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने पेरण्या पूर्णपणे थांबल्या आहेत. जिल्हय़ात गेल्या वर्षी याचवेळी 25 टक्के पेरण्या झाल्या होत्या. पण, यावर्षी मात्र ती सरासरीही गाठू शकली नाही.

जिल्हय़ात दुष्काळी भागासह सुकाळी तालुक्यातही आठवडय़ापूर्वी चांगल्या पध्दतीने पाऊसमान झाला. त्यामुळे बळीराजा सुखावला होता. त्याने तातडीने पेरण्याचे कामकाज सुरू केले होते. पण, दोन ते चार दिवसापासून मात्र पाऊसमान थांबल्याने तो चिंतेत अडकला आहे. तसेच ज्या शेतकऱयांनी पेरण्या केल्या आहेत. त्यांच्याही चिंतेत वाढ झाली आहे. कारण तातडीने जर पाऊस सुरू झाला नाही तर त्यांच्यासमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे.

जिल्हय़ात गेल्या काही वर्षापासून पहिले दोन पाऊस चांगल्या पध्दतीने होतात आणि त्यानंतर पाऊस थांबला जातो आणि तो पंधरा ते वीस दिवस गायब होता. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या जातात. यावर्षीही तसे होण्याची शक्यता अनेक शेतीतज्ञांनी व्यक्त केली आहे. येत्या दोन दिवसात जर पाऊस झाला नाही तर या पेरण्या पुर्णपणे थांबल्या जाणार आहेत.

Related posts: