|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » विदेशी पर्यटकांना कोटय़वधी रुपयांना लुटले

विदेशी पर्यटकांना कोटय़वधी रुपयांना लुटले 

प्रतिनिधी/ पणजी

गोव्यात घर मिळवून देतो, असे सांगून सनातन फायनान्स अँड रिएल इस्टेट कंपनीने अनेक विदेशी पर्यटकांना कोटय़वधी रुपयांना गंडा घातल्याची माहिती उघड झाली आहे. विदेशी महिलेवर लैंगिक अत्याचार तसेच जीवंत मारण्याची धमकी देण्यासारख्या अनेक गुन्हेगारी प्रकरणात सहभागी असलेले सनातन फायनान्सचे मालक सुनील कुमार व अंकित कुमार यांच्यावर अद्याप केपे पोलिसांकडून कोणतीच कारवाई झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मूळ दिल्लीतील पिता-पूत्र असलेल्या या दोघांनीही गोव्यात राहून गोव्यात येणाऱया विदेशी पर्यटकांना लुटून गोव्याचे नाव बदनाम केले असले तरी त्यांच्या विरोधात सरकार कोणतीच पावले का उचलत नाहीत, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

पोलिसांकडून तक्रारदारांचीच सतावणूक

 रशियन पर्यटक व्हायोलेटा सुरोस्तेवा यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सुनील कुमार व अंकित कुमार या पितापुत्राच्या काळय़ाकृत्यांचा पर्दाफाश केला आहे.  याबाबत अनेकांनी केपे पोलीस स्थानकात तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र संशयितांच्या विरोधात अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. उलट तक्रारदारांच्याच विरोधात व्हिझा नियमाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंदवून त्यांची सतावणूक केली जात आहे, असेही त्या म्हणाल्या.

 फ्लॅट सोडण्यासाठी प्रचंड दबाव : व्हायोलेटा

 व्हायोलेटा यांनी सांगितले की आपण 2010 साली सुनील कुमार याला फ्लॅट खरेदीचे लाखो रुपये दिले होते. आपल्याजवळ पावत्याही होत्या. मात्र तो फ्लॅट देण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे अखेर न्यायालयाचा आधार घेऊन तब्बल सात वर्षानी आपण फ्लॅट ताब्यात घेतला. सध्या सदर फ्लॅट सोडावा म्हणून आपल्यावर विनाकारण आरोप करून धमकाविले जाते तसेच तक्रारी दाखल करण्यात येत आहेत. इतकेच नव्हे तर आपल्याला मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. याबाबत तक्रारी दाखल केल्या आहेत, मात्र पोलीस सहकार्य करीत नाहीत, असे त्या म्हणाल्या.

 सध्या आपल्या विरोधात व्हिझा नियमांचे उल्लंघन केल्याची तक्रार न्यायालयात असल्याने आपल्याला घरी जाता येत नाही. तसेच गोव्यात राहणेही धोक्याचे ठरले आहे. विदेशी असल्याने नोकरी करता येत नाही. त्यामुळे आपले उत्पन्नाचे कोणतेच साधन नसल्याने उपासमारीची पाळी येण्याची वेळ आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

 पोलिसांना हाताशी धरुन पर्यटकांची सतावणूक

पर्यटन खात्याच्या माहितीप्रमाणे दरवर्षी गोव्यात 7 लाखाहून अधिक विदेशी पर्यटक येत असतात. अशा पर्यटकांना हेरून त्यांना गोव्यात त्यांच्या मालकीचे दुसरे घर उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवले जाते. तयार असलेला एखादा प्रकल्पही दाखविला जातो. एकदा पैसे मिळाले की अनेक कारणे पुढे करुन नंतर पैसेही नाही आणि घरही नाही अशी त्यांची स्थिती करून सोडली जाते. इतकेच नव्हे तर पोलिसांना हाताशी धरुन त्या पर्यटकांविरोधात बनावट तक्रारी दाखल केल्या जातात.