|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » स्मार्टसिटी योजनेंतर्गत 24 रोजी कंपनीची बैठक

स्मार्टसिटी योजनेंतर्गत 24 रोजी कंपनीची बैठक 

बेळगाव

शहर स्मार्ट करण्यासाठी स्मार्टसिटी कंपनीचे कामकाज युद्धपातळीवर सुरू असून लवकरच निविदा प्रक्रिया राबवून शहरातील तीन रस्त्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे. रहदारी नियंत्रण आदी विकासकामे पहिल्या टप्प्यात राबविण्यात येणार आहेत. कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासह विविध कामकाजासाठी शनिवार दि. 24 रोजी बेंगळूर येथे स्मार्टसिटी कंपनीच्या संचालकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

स्मार्टसिटी योजनेंतर्गत विकासकामे राबविण्यासाठी कन्सल्टंट कंपनीचे अधिकारी आणि स्मार्टसिटी कंपनीच्या अधिकाऱयांनी चर्चा करून आराखडे तयार करण्याचे काम युद्धपातळीवर चालविले आहे. रस्त्यांचा विकास आणि वाहतूक नियंत्रण व्यवस्था, व्हॅक्सिन डेपोचा विकास, उद्यानांचा विकास आदी योजना पहिल्या टप्प्यात राबविण्याचा प्रस्ताव आहे. याकरिता आवश्यक तयारी करण्यात आली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्यांचा विकास करण्याचा प्रस्ताव स्मार्टसिटीअंतर्गत राबविण्यात येणार आहे. याकरिता विविध शहरात राबविण्यात आलेल्या कामांची माहिती घेण्यात येत आहे.

सध्या प्रायोगिक तत्त्वावर तीन ठिकाणांच्या रस्त्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे. याकरिता निविदा काढण्यात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. दुसऱया टप्प्यात राबविण्यात येणाऱया विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी शनिवार दि. 24 रोजी बेंगळूर येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी विविध खात्यामार्फत नियुक्त करण्यात आलेले कार्यकारी संचालक उपस्थित राहणार आहेत.

बैठकीला उपस्थित राहण्याची नोटीस महापौर संज्योत बांदेकर यांना देण्यात आली आहे. मात्र दि. 24 रोजी स्थायी समिती निवडणूक असल्याने बैठकीला उपस्थित राहण्याबाबत साशंकता आहे. पण निवडणूक बिनविरोध होत असल्यास बेंगळूर येथील स्मार्टसिटी बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे महापौर संज्योत बांदेकर यांनी सांगितले.