|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा

महामार्ग बनतोय मृत्यूचा सापळा 

सिंधुदुर्गनगरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन 23 जूनला कुडाळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते होत आहे. भविष्यकालीन रस्ते व पर्यटन विकासाच्यादृष्टीने स्वागतच आहे. परंतु, सध्याच्या मुंबई-गोवा महामार्गावर खड्डे पडून झालेल्या दुर्दशेकडे कुणी लक्ष देईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मागील वर्षी खड्डय़ांमुळे अनेकांचे हकनाक बळी गेल्यानंतर मलमपट्टी करण्यात आली. परंतु यावर्षी पहिल्याच पावसात महामार्ग उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा अपघातांची भीती वाढली आहे.

   मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आदींसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळय़ाची जय्यत तयारी सुरू आहे. चौपदरीकरणाच्या शुभारंभाचे स्वागतच करायला हवे आणि ते वेळेत होण्यासाठी जनतेने सहकार्यही करायला हवे. परंतु हे सर्व करीत असताना महामार्गाच्या सध्याच्या दुर्दशेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

    महामार्गाचे चौपदरीकरण होणार असल्याने सध्याच्या महामार्गाचे नूतनीकरण,  डांबरीकरण थांबविलेले आहे. केवळ खड्डे बुजवण्याची मलमपट्टी केली जात आहे. गतवर्षी महामार्गावर पडलेल्या खड्डय़ांबाबत सर्वच स्तरातून टीका होऊ लागली. अनेकांचे बळी गेल्यानंतर पावसाळा संपताच काही ठिकाणी पॅचवर्कचे काम केले गेले. परंतु पहिल्याच पावसात महामार्गावर ठिकठिकाणी भलेमोठे खड्डे पडून महामार्गाची दुर्दशा झाली आहे. मोठा पाऊस असल्यावर खड्डेही दिसत नाहीत, अशी स्थिती आहे. जिल्हय़ात अजून पाऊस पडायचा आहे. त्यामुळे आणखी दैनावस्था होणार आहे.

  खासदार विनायक राऊत यांनी नुकतीच महामार्गाची पाहणी करून 30 जूनपर्यंत खड्डे भरण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता भर पावसात खड्डे भरणार का? हा प्रश्नच आहे. एकीकडे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन करीत असताना लोकप्रतिनिधींनी महामार्गाच्या सध्याच्या दुर्दशेकडेही लक्ष देणे आवश्यक आहे.