|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » ‘बेस्ट’चा संप टळला कर्मचाऱयांना आज पगार मिळणार

‘बेस्ट’चा संप टळला कर्मचाऱयांना आज पगार मिळणार 

प्रतिनिधी, मुंबई

बेस्टच्या अधिकारी व कर्मचाऱयांना मे महिन्याचा थकीत पगार उद्या दिला जाणार आहे. त्यामुळे बेस्ट वर्कर्स युनियनने दिलेला संपाचा इशारा आता मागे घेतला आहे. संप करणार नाही, असे युनियनचे नेते शशांक राव यांनी ‘तरुण भारत संवाद’च्या प्रतिनिधींनी बोलताना सांगितले. बेस्ट उपक्रम सध्या 4 हजार कोटी रुपये आर्थिक बोज्याखाली दबला असून त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून बेस्टच्या अधिकारी व कर्मचाऱयांना उशिराने पगार दिला जात आहे. बेस्टकडे पैसे नसल्याने पगाराची रक्कम जमा करण्यासाठी बँकांचे उंबरठे झिजवले जात आहेत.

बेस्टच्या कर्मचारी-अधिकाऱयांना गेल्या महिन्याचा अर्धा पगारच देण्यात आला आहे. त्यामुळे बेस्ट वर्कर्स युनियनचे नेते शशांक राव यांनी येत्या 22 जूनच्या रात्रीपर्यंत अधिकारी व कर्मचाऱयांच्या पगार न दिल्यास संपाचा इशारा दिला होता. त्याची गंभीर दखल घेऊनच बेस्ट प्रशासन व सत्ताधारी पक्ष कामाला लागले. बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकिळ यांनी ताबडतोब महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याशी बोलणे करून 27 जून रोजी महापौर आयुक्त, बेस्टचे महाव्यवस्थापक आदींची बैठक लावण्यात आली आहे.

तसेच बेस्ट समिती अध्यक्ष स्वत: बेस्टच्या कामगार संघटनांसोबत 23 जून रोजी बेस्टच्या आर्थिक स्थितीबाबत बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. दरम्यान, बेस्ट प्रशासनाने बुधवारी तातडीने एक पत्र कामगार नेते शशांक राव यांना पाठवले. हे पत्र शशांक राव यांना हातोहात मिळाले. बेस्टच्या अधिकारी व कर्मचारी यांना आज पगार देण्यात येईल, असे पत्रात म्हटले आहे. जर उद्या बेस्टच्या अधिकारी व कर्मचाऱयांना पगार मिळणार असेल तर आम्ही संप करण्याचा प्रश्न उद्भवत नाही, असे शशांक राव यांनी सांगितले. त्यामुळे आता 22 जूनच्या रात्रीनंतर सुरू होणारा नियोजित बेस्ट संप टळला आहे.

 

Related posts: