|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » यहाँ जिना हैं मुश्कील…

यहाँ जिना हैं मुश्कील… 

प्रतिनिधी, मुंबई

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे आकर्षण जगभरातील लोकांना आहे. मुंबईतील वैभवशाली वास्तू पाहण्यासाठी, येथील समुद्रकिनाऱयांचा आनंद लुटण्यासाठी जगभरातील पर्यटक मुंबईत येतात. तसेच अनेक परदेशी नागरिक नोकरीनिमित्त, शिक्षणासाठीही मुंबईत येतात. मात्र मर्सर संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार मुंबई हे पर्यटकांसाठी आणि नोकरीनिमित्ताने आलेल्या नागरिकांसाठी महाग शहर ठरले आहे. येथे होणारा अर्थार्जनाचा खर्च हा अधिक आहे. जागतिक क्रमवारीत मुंबईचा 57 वा क्रमांक लागतो. 2016 साली मुंबईचा 82 वा क्रमांक होता.

मर्सर संस्थेतर्फे दरवर्षी जगभरातील शहरांमधील जीवनावश्यक खर्चाबाबत सर्व्हेक्षण केले जाते. यंदा केलेल्या सर्व्हेक्षणात मुंबई 57 व्या क्रमांकावर आहे. अँगोला या देशाची राजधानी असलेल्या ल्युएण्डा हे शहर जगातील सर्वात महाग शहर ठरले आहे. हे शहर सर्व्हेक्षणात प्रथम स्थानावर आहे. भारताचा विचार केल्यास पर्यटकांसाठी मुंबई सर्वात खर्चिक ठरत आहे. या सर्व्हेक्षणात नवी दिल्ली 99 व्या स्थानावर आहे. तर चेन्नई (135), बंगळूरू (166), कोलकाता (184) या शहरांचाही समावेश आहे. मुंबईने या क्रमवारीत ऑकलॅण्ड (61), डल्लास आणि पॅरिस (62), पॅनबेरा (71), सीटल (76) आणि व्हिएन्ना (78) या शहरांना मुंबईने मागे टाकले आहे. मुंबईमध्ये जेवण आणि हॉटेलचा खर्च सर्वाधिक आहे.  चीज, बटर, मासे, मटण यांच्या किमती गेल्या काही वर्षांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढल्या आहेत. जगभरातील पर्यटकांची याच खाद्यपदार्थांना अधिक पसंती मिळते. याशिवाय कांदे, टोमॅटो, अननस यासारख्या फळे आणि भाज्यांच्या किमतीमध्येही मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. वाहतुकीचा खर्चही मुंबईत अधिक दिसून आला आहे. टॅक्सी आणि रिक्षाचे भाडेही मोठय़ा प्रमाणात वाढले आहे.

टय़ुनिस (209), बिश्केक (208), कोपजे आणि विन्डोक (206), ब्लान्टायर (205), बिलीसी (204), मॉण्टेरेरी (203), सॅराजेवो (202), कराची (201) आणि मिन्स्क (200) ही जगातील सर्वात स्वस्त शहरे आहेत असे या सर्व्हेक्षणात नमूद केले आहे. ल्युएण्डा या शहरानंतर हाँगकाँग (2), टोकियो (3), झ्युरिच (4), सिंगापूर (5) ही जगभरातील महागडी शहरे आहेत. याशिवाय सिऊल, जिनेव्हा, शांघाय, न्यूयॉर्क, बर्न या शहरांचा क्रमवारीत पहिल्या दहामध्ये समावेश आहे. या यादीमध्ये युरोप खंडातील शहरांचा पहिल्या दहामध्ये समावेश आहे.

या सर्व्हेक्षणाविषयी अधिक माहिती देताना मर्सरच्या भारतातील प्रमुख रुचिका पाल यांनी सांगितले की, 2016 साली जाहीर झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे घरांच्या किमती मोठय़ा प्रमाणात वाढल्या. तर भाडय़ाने घर घेऊन तात्पुरती स्वत:ची सोय करणाऱयांची संख्या वाढली. यामुळे या किमतीमध्येही आपसूकच वाढ झाली असे रुचिका पाल यांनी सांगितले. आफ्रिका, आशिया आणि युरोप खंडातील शहरे ही वर्षागणिक महागडी होत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. या सर्व्हेक्षणात अमेरिकेतील शहरांच्या जीवनावश्यक खर्चामध्ये गेल्या एका वर्षात फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे इतर शहरांच्या तुलनेत अमेरिकेतील शहरे तुलनेने स्वस्त आहेत असे सर्व्हेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

 

देशातील शहरांची क्रमवारी

शहर – 2017- 2016

मुंबई – 57- 82

नवी दिल्ली – 99- 130

चेन्नई – 135- 158

बंगळुरू – 166- 180

कोलकाता – 184- 194

Related posts: