|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » उद्योग » भारतात दाखल होणार 800 नवी कोरी विमाने

भारतात दाखल होणार 800 नवी कोरी विमाने 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था :

 दोन आकडी विकासदर साधत असणाऱया भारतीय हवाईवाहतूक बाजारात लवकरच तब्बल 800 नवी-कोरी विमाने दाखल होणार आहेत.

किफायतशीर हवाई वाहतूक कंपन्या स्पाईसजेट, इंडिगो, गोएअर आणि जेट एअरवेज या कंपन्यांनी नवी विमाने आपल्या ताफ्यात समावेश करण्यासंबंधी ठोस योजना आखल्या आहेत. तर यापैकी स्पाईसजेट सारख्या काही कंपन्यांनी विमान निर्मीती कंपन्याबरोबर अंतिम करार देखील केला आहे. सध्या भारतात फक्त 500 प्रवासी विमाने कार्यरत आहेत.

फ्रान्सची राजधानी पॅरिस मध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय विमान-प्रदर्शनात (एअर-शो) स्पाईस जेट ने बुधवारी 40 ‘क्यू400 टर्बोप्रॉप’ विमान खरेदीबाबत बंबार्डीयरशी करार झाल्यची घोषणा केली. तर एक दिवसा अगोदर म्हणजे मंगळवारी स्पाईसजेटने बोईंग सोबत बोईंग 737 मॅक्स10 प्रजातीच्या अत्याधुनिक 20 विमाने खरेदी करण्याबाबतच्या कराराला अंतिमरूप दिले.  या वर्षारंभीच स्पाईसजेटने आपल्या ताफ्यात 205 नव्या विमानांचा समावेश करण्याकरीता बोईंगशी करार झाल्याचे जाहीर केले होते. तसेच यावर्षीच्या जानेवारीमध्ये गो-एअर ने ए320 निओ प्रजातीच्या 72 विमानांची मागणी नोंदवली आहे. तर आघाडीची हवाईवाहतूक कंपनी इंडिगोने एअरबसच्या 430  ‘ए 320 निओस’ साठी 2011 आणि 2014 मध्येच करार केला आहे. याव्यतिरीक्त प्रादेशिक सेवा विस्ताराकरीता आणखी 50 छोटी विमाने खरेदी करण्याची कंपनीची योजना आहे. तर ईंधनबचतीकरीता ओळखल्या जाणाऱया बोईंग 737 मॅक्स 8 विमानाकरीता जेट एअरवेजने 2015 साली नोंदवलेल्या मागणीची लवकरच पुर्तता होणार आहे.

भारतीय प्रवासी हवाईवाहतूक क्षेत्र वेगाने विस्तारत असून यावर्षीच्या जानेवारी महिन्यात त्याने 25.13 टक्क्याचा वृद्धीदर गाठला आहे. तर गत मे महिन्यात भारतीय विमान कंपन्यांनी एक कोटी प्रवाशांची विक्रमी वाहतूक केल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. सिडनी मधील सेंट फॉर एव्हिएशन या संस्थेनूसार घरगुती प्रवासी वाहतूकीबाबत भारत तृतीय क्रमांकाचा बाजार आहे.