|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » सीएसटीची दोन असुरक्षित प्रवेशद्वारे बंद होणार

सीएसटीची दोन असुरक्षित प्रवेशद्वारे बंद होणार 

मुंबई / प्रतिनिधी

मुंबईतील रेल्वेस्थानकांना अनेक प्रवेशद्वार असल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखताना आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांना नेहमीच अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सीएसटीसारख्या प्रमुख टर्मिनसची सुरक्षा भक्कम राखण्यासाठी त्यातील दोन असुरक्षित प्रवेशद्वारे कायमची बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ)ने घेतला आहे.

सीएसटीमधील लांब पल्ल्यांच्या मार्गाकडील प्लॅटफॉर्मकडील पार्सल विभागाकडील प्रवेशद्वाराप्रमाणेच हार्बरकडील प्लॅटफॉर्म क्रमांक एककडील मध्यभागी असणाऱया प्रवेशद्वाराचा समावेश आहे. त्यापैकी पार्सल विभागाकडील प्रवेशद्वार बंद करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तर, प्लॅटफॉर्म एककडील प्रवेशद्वाराबाबत रेल्वे प्रशासनाकडून अंतिम निर्णय बाकी आहे.

सीएसटी, दादर, चर्चगेट, ठाणे, कुर्ला, बोरीवलीसारख्या स्थानकातील प्रवाशांची संख्या मोठी असते. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सीएसटीमधील  कमकुवत सुरक्षाव्यवस्थेचा अनुभव मुंबईकरांना आला. त्यानंतर इथली सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यासाठी नव्याने घडी बसविण्यात आली. सीसीटीव्ही पॅमेऱयांसह कमांडोसारखे विविध पर्याय अवलंबण्यात आले. तरीही सीएसटीत काही ठिकाणी अजूनही असुरक्षित प्रवेशद्वारांचा प्रश्न शिल्लक आहे. ही बाब लक्षात घेता रेल्वे सुरक्षा बलाने ही दोन्ही प्रवेशद्वारे कुलुपबंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी, पार्सल विभागातील प्रवेशद्वार बंद करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आल्याचे आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी सांगितले.

सीएसटीमध्ये 12 ठिकाणी तर चर्चगेटमध्ये 10 पेक्षा जास्त प्रवेशद्वार आहेत.  मेट्रो सेवेप्रमाणे स्थानकांवर प्रवेश करण्यावर मर्यादा नसल्याने सुरक्षेचे प्रश्न येतात. त्यासाठीच दोन्ही प्रवेशद्वार बंद करण्यावर आरपीएफ ठाम आहे. मात्र, काही कालावधीपूर्वी सीएसटीकडील लोकल मार्गावरून मेल-एक्प्रेस सेवेकडे जाणारा मार्ग बंद करण्यात आला होता. पण त्यास विरोध झाल्यानंतर हा मार्ग पुन्हा खुला करण्यात आला होता.

Related posts: