|Thursday, December 13, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » मुंबईकरांनो आता छत्री उघडाच

मुंबईकरांनो आता छत्री उघडाच 

रेंगाळलेला मान्सून पुन्हा सक्रिय : मुंबई शहर, उपनगर, नवी मुंबई , ठाणे शहरात तुरळक ठिकाणी जोरदार तर बहुतांश ठिकाणी अधूनमधून सरी बरसल्या.

गुरुवारी छत्री न घेता घरातून निघालेल्या मुंबईकरांनी पावसाच्या आल्हाददायी सरींचा अनुभव घेतला. मुंबई शहर, उपनगर, नवी मुंबई आणि ठाणे शहरात तुरळक ठिकाणी जोरदार तर बहुतांश ठिकाणी अधूनमधून सरी बरसल्या. गेल्या चार दिवसापासून रेंगाळलेला मान्सून अरबी समुद्रात पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने मुंबईसह कोकण किनारपट्टीवर अधुनमधून पावसाच्या सरी अनुभवयास मिळतील. त्यामुळे आता घराबाहेर पडताना मुंबईकरांनी छत्री घेण्यास सुरुवात करावी, असे संकेत मिळत आहेत.

मान्सूनच्या अनुकुल स्थितीला हवामानीय अडसर निर्माण झाला होता. आता मात्र मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱयाने सांगितले. उपग्रहीय छायाचित्रानुसार, मान्सून डाव्या बाजूने सरकताना काही दिवस थांबला होता. सध्या मान्सून उजव्या बाजूने सरकत असून आगामी तीन चार दिवसात गुजरातमध्येही जाण्याची शक्यता असल्याची त्यांनी सांगितले. गुरुवारी सकाळपासून मुंबई शहर, उपनगर, ठाणे-नवी मुंबई परिसरातही ढगाळ वातावरण निर्माण झाले. यावेळी बहुतांश भागात पावसाच्या सरी अनुभवयास मिळाल्या. तर नवी मुंबई ठाणे परिसरात दुपारनंतर मुसळधार पाऊस झाला.

सरींचाच पाऊस का?

गुरुवारच्या ढगाळ वातावरणातील ढगात पाण्याची घनता कमी प्रमाणात होती. भरून आलेल्या ढगांचा रंग काळसर निळा असतो. तसेच बुधवारचे ढग काळेकुट्ट नसून त्यातून प्रकाश सरकताना दिसत होता. शिवाय सध्याचे ढग हलके असून उंचीवर आहेत. अशा ढगांमधून मुसळधार पावसाऐवजी सरींच होतात.

इशारा

23 ते 25  जून कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. तर 26 जून रोजी दक्षिण-कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता तर विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मुंबई आणि पुण्यात सरी पडण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया

मान्सूनमध्ये पावसासाठी आवश्यक असलेल्या अनुकुल स्थितीत सतत बदल घडत असतात. सध्या अरबी समुद्रात मान्सूनला अनुकुल स्थिती पुन्हा दिसू लागली आहे. त्यामुळे पश्चिमेकडील वाऱयाची तीव्रता थोडीशी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई प†िरसर आणि कोकण किनारपट्टीवर अधुनमधून पावसाच्या सरी अनुभवयास मिळतील.

– कृष्णानंद होसाळीकर, उप महासंचालक, मुंबई विभाग, हवामान विभाग.

हवामान घडामोडी

गुरुवारी नैऋत्य मौसमी पाऊस छत्तीसगड आणि झारखंडच्या उर्वरित भागात विदर्भ व बिहारच्या आणखी काही भागात आणि पूर्व मध्य प्रदेशाच्या काही भागात दाखल झाला आहे. तर बुधवारी कोकण गोव्यात बऱयाच ठिकाणी विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व मराठवडय़ात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. राज्याच्या घाटमाथ्यावर ही 1 ते 3 मिमी पाऊस पडला. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱया तलावक्षेत्रात 1 मिमी पाऊस झाला.  

Related posts: