|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » उगारखुर्द कृष्णा नदीवरील बांधाऱयाची उंची वाढविणार

उगारखुर्द कृष्णा नदीवरील बांधाऱयाची उंची वाढविणार 

उगारखुर्द/वार्ताहर :

  शासनाच्या लघू पाणीपुरवठा खात्याकडून कृष्णा नदीचे पाणी अडविण्यासाठी येथील कृष्णानदीवरील बांधाऱयाची 4 फुटाने उंची वाढविण्यात येणार आहे. यासाठी 28 जूनअखेर टेंडर मागविण्यात आले आहे. महिनाअखेर टेंडर प्रक्रिया पूर्ण करून लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच खेमलापूर ते कृष्णाकित्तूर व मांजरी ते अंकली दरम्यान बांधाऱयाची निर्मिती करण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार प्रकाश हुक्केरी यांनी दिली. चिकोडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 खासदार पुढे म्हणाले, खेमलापूर ते कृष्णाकित्तूर दरम्यान बांधण्यात येणाऱया बंधाऱयास 6 कोटी, मांजरी ते अंकली व उगारखुर्द येथील कृष्णानदीवरील बांधाऱयाची उंची वाढविण्यास प्रत्येकी 5 कोटी खर्च येणार आहे. अलिकडेच उन्हाळय़ात कृष्णानदी कोरडी पडली होती. त्यामुळे चिकोडी व रायबाग तालुक्याला पाण्याची तीव्र टंचाई भासली होती. यामुळे कृष्णेत पाणी सोडण्यासाठी महाराष्ट्राकडे मागणी करावी लागते. तसेच पाणी न आल्यास कृष्णाकाठावरील नागरिक आंदोलन छेडतात.

 या पार्श्वभूमिवर खेमलापूर ते कृष्णाकित्तूर, मांजरी ते अंकली बांधारा निमिर्ती व उगारखुर्द कृष्णानदीवरील बंधाऱयाची 4 फुटाने उंची वाढविण्यात येणार आहे. यामुळे कृष्णाकाठावरील नागरिकांना पाणी टंचाईला तेंड द्यावे लागणार नाही. तसेच उगारखुर्द येथील बांधाऱयाची उंची वाढविल्यामुळे कृष्णेत एक टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होणार आहे, असे खासदार हुक्केरी यांनी सांगितले. या बंधाऱयाची उंची वाढविण्यासाठी उगार साखर कारखान्याने बऱयाच वर्षापासून प्रयत्न केले आहेत.