|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ‘गोमटेश’च्या शेडसाठी पुन्हा दहा दिवसांची मुदतवाढ

‘गोमटेश’च्या शेडसाठी पुन्हा दहा दिवसांची मुदतवाढ 

प्रतिनिधी /बेळगाव :

गोमटेश विद्यापीठासमोरील 60 फुटी रस्त्यावर थाटण्यात आलेले अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईसाठी गुरुवारी महापालिकेची यंत्रणा गेली होती. मात्र, सदर वाद न्यायालयात असून या ठिकाणी यंत्रोपकरणे असल्याने हटविण्याकरिता पंधरा दिवसांची मुदत देण्यात यावी, अशी मागणी आमदार संजय पाटील यांनी केली. यामुळे महापालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करून दहा दिवसात यंत्रोपकरणे हटविण्याची सूचना करून कारवाई थांबविण्याचा निर्णय घेतला. यामुळे पुन्हा दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आल्याने गोमटेशसमोरील शेडवरील संकट तूर्तास टळले आहे.

रस्त्यावरील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटविण्याची कारवाई महापालिकेच्यावतीने राबविण्यात आली होती. त्यावेळी गोमटेश विद्यापीठासमोरील रस्त्यावरील शेड हटविण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच न्यायालयानेदेखील शेड हटविण्याचा आदेश दिला असता, शैक्षणिक संस्था असल्याने स्थलांतराकरिता अवधी देण्याची विनंती करून स्वत:हून अतिक्रमण हटवून घेण्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दिले होते. तरीदेखील महापालिकेच्या अधिकाऱयांनी कोणतीच कारवाई केली नाही. याबाबत वारंवार सूचना करूनही कानाडोळा करण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार शेड हटवून येथील नागरिकांना रस्ता मोकळा करून देण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम स्थायी समिती बैठकीत घेण्यात आला होता. मात्र याची अंमलबजावणी करण्याकडे महापालिकेच्या अधिकाऱयांनी टाळाटाळ केली होती. यामुळे शेड हटविण्यात यावे, या मागणीकरिता दि. 24 रोजी सार्वजनिक बांधकाम स्थायी समिती अध्यक्ष विनायक गुंजटकर यांनी  धरणे आंदोलन छेडले होते. त्यावेळी कायद्याच्या चौकटीत कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. रस्त्यावरील शेडबाबतची तक्रार नगरविकास खात्याकडे करण्यात आली होती. यामुळे शेड हटविण्याचा आदेश नगरविकास खात्याच्या सचिवांनी दिला होता. या आदेशानुसार शेड हटविण्याचा आदेश महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यांनी दिला होता. यानुसार महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे पथक गुरुवारी सांयकाळी 5 वाजता गोमटेश विद्यापीठासमोरील शेड हटविण्यासाठी गेले होते. मात्र यावेळी गोमटेश विद्यापीठातील कर्मचारी शेडच्या आतील भागात थांबले होते. तसेच शेड हटविण्यास गेलेल्या अधिकाऱयांकडे आदेशाची विचारणा आमदार संजय पाटील यांनी केली. यावेळी शहर अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांनी आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची प्रत दाखविली. पण सदर शेडबाबत न्यायालयात वाद असल्याची माहिती देण्यात आली. तसेच याबाबतची कागदपत्रे वकिलांनी दाखविली. यामुळे लक्ष्मी निपाणीकर यांनी महापालिकेचे कायदा अधिकारी महांतशेट्टी यांना संपर्क साधून बोलावून घेतले असता, यावेळी शेडधारकांच्या वकिलांनी आपली बाजू मांडली. सदर शेडबाबत न्यायालयात वाद सुरू असून न्यायालयाने अद्याप कोणताच निकाल दिला नाही. तसेच शैक्षणिक संस्था असल्याने पंधरा दिवसांची मुदत देण्यात यावी, अशी विनंती केली. यामुळे कायद्याच्या बाबीची तपासणी केली असता, शेड हटविण्यास कोणतीच अडचण नव्हती. मात्र, शैक्षणिक संस्था असल्याने याबाबतची माहिती कायदा अधिकारी महातंशेट्टी यांनी आयुक्त शशीधर कुरेर यांना दिली. यामुळे महापालिका आयुक्त शशीधर कुरेर व प्रभारी नगरयोजना अधिकारी व शहर अभियंते आर. एस. नायक त्या ठिकाणी दाखल झाले.

Related posts: