|Saturday, March 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » राष्ट्रपती निवडणूक : विरोधक एकसंध?

राष्ट्रपती निवडणूक : विरोधक एकसंध? 

जगातील सर्वात मोठय़ा लोकशाही राष्ट्रात 17 जुलै रोजी होणार असलेल्या निवडणुकीसाठी वातावरण आत्ता कुठे तापायला लागले आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने राष्ट्रपतीपदासाठी बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचे नाव पुढे काढले आणि मूळ उत्तर प्रदेशचे असलेल्या या दलित नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व इतर अनेक नेत्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरला. केंद्रात भाजप सत्तेवर आहे. त्याला इतर अनेक समविचारी पक्षांचे सहकार्य प्राप्त झालेले आहे. त्यामुळे कोविंद यांचा विजय निश्चित आहे. गुरुवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांना एकत्रित बोलावून कोविंद यांच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांतर्फे एक उमेदवार उभे करण्यासाठी चर्चा केली आणि अपेक्षेप्रमाणे  मीराकुमार यांची राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून निवड केली. मीराकुमार यांची निवड करण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीच्या पूर्वसंध्येला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जदयू या आपल्या पक्षाची बैठक घेतली व त्यात बिहारचे राज्यपाल कोविंद यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. विरोधी पक्षांच्या ऐक्याला नितीशकुमार यांनी सुरुंग लावला. त्याची कारणेही तशीच आहेत. बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली सध्या आघाडी सरकार सत्तेवर आहे. यामध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राजद आणि काँग्रेसचा समावेश आहे. या आघाडीमध्ये लालू व त्यांच्या कुटुंबीयांनी चालविलेली दादागिरी नितीशकुमार यांना असहय़ बनलेली आहे. केंद्रात नरेंद्र मोदींबरोबर नितीशकुमार यांनी वैर धरले त्यामुळेच त्यांनी भाजपला बिहारमध्ये सत्तेतून बाहेर फेकले होते. आता लालूंचा अनुभव लक्षात घेता भाजप त्यांना जास्त सोयिस्कर होता व मोदींना देशभरात मिळणारा प्रतिसाद पाहता नितीशनाही त्यांच्या विरोधात जादा कटुता बाळगण्यात अर्थ वाटत नाही. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने देशातील अनेक राजकीय समीकरणेही बदलू लागतील. त्याची सुरुवात बिहारमधून होणार हे नक्की. नितीशकुमार यांना अडचणीत आणण्यासाठी काँग्रेस व लालूंनी मीराकुमार यांची निवड करून नितीशकुमारसमोर आणखी एक अडचण निर्माण केली. मीराकुमार या दलित नेते व माजी केंद्रीय मंत्री बाबू जगजीवनराम यांच्या कन्या! त्या माजी प्रशासनिक अधिकारी आहेत. लोकसभेच्या माजी सभापतीही आहेत. नितीशकुमार यांनी कोविंदसाठी आपला शब्द दिलेला आहे. आता माघार कशी घ्यायची? दुसरे म्हणजे मीराकुमार या बिहारच्या कन्या! त्यांच्या विरोधात मतदान करणे म्हणजे बिहारशी प्रतारणा करण्यासारखे! लालू आणि कंपनीने नितीशकुमार यांना सध्यातरी अडचणीत आणले. या निवडणुकीच्या निमित्ताने विरोधी पक्ष एकत्रित आलेले असले तरी काही विरोधी पक्षांनी भाजपने निवड केलेल्या कोविंद यांना आपले समर्थन जाहीर केल्याने कोविंद यांची निवड निश्चित आहे, मात्र मीराकुमार यांच्या पारडय़ात 17 पक्षांची मते पडतील. दिल्लीच्या ‘आप’ची मतेदेखील मीराकुमार यांच्या वाटय़ाला येतील. या निवडणुकीत सध्याच्या परिस्थितीत नितीशकुमार यांचा पक्ष जमेस धरला तर कोविंद यांना 70 टक्के मते मिळतील, असा अंदाज आहे. देशात राजकीय पक्षांमध्ये एवढी मतभिन्नता आहे की, राष्ट्रपतीपदाची निवडणूकदेखील बिनविरोध होऊ शकत नाही. काँग्रेस स्वतंत्र उमेदवार उभा करणार याची सर्वांनाच कल्पना होती. या निवडणुकीच्या निमित्ताने का होईना अनेक वर्षांनी प्रथमच विरोधी पक्ष एकत्र येतील. विरोधी पक्षाचा उमेदवार काही विजयी होणार नाही याची साऱयांनाच कल्पना आहे, तरीदेखील भाजप व मोदी विरोधात राजकीय पक्ष एकत्र येऊ लागले आहेत. प्रत्यक्षात आगामी लोकसभा निवडणुकीत हे पक्ष एकत्र येतील का याबाबत शंकाच आहे. अद्याप आगामी लोकसभा निवडणुकीस दोन वर्षे आहेत. भाजप आतापासून कामास लागला आहे. विरोधी पक्ष मात्र शांत आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने लालूंनी काँग्रेसच्या मदतीने जी खेळी खेळली ती नितीशकुमार यांना चांगलीच अडचणीत आणणारी ठरली आहे. त्याचे परिणाम काय होतील हे सांगता येत नाही, परंतु एक खरे, राजकीय समीकरणेही वारंवार बदलत जातात. कैकवेळा स्वकीय हे परके बनतात व परके स्वकीय बनतात. मोदी आणि भाजप सध्या बिनधास्त आहेत. भाजपला लोकसभेत पूर्ण बहुमत आहे. राज्यसभेत संख्याबळही वाढलेले आहे. मुख्य म्हणजे उत्तर प्रदेश विधानसभा आणि तेथील खासदारांचे सर्वाधिक संख्याबळ हे भाजपच्या बाजूने आलेले आहे. शिवाय अनेक विधानसभा या भाजप व मित्रपक्षांच्या असल्याने कोविंद यांचा मार्ग सुकर झाला आहे. विरोधी पक्षांना आशा होती की शिवसेना त्यांच्याबरोबर येईल. शिवसेनेने त्यासाठी भाजप विरोधात डरकाळी फोडली खरी परंतु भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या ‘मातोश्री भेटी’नंतर शिवसेनेचा भाजपविरोध मावळला. तेलंगणा राष्ट्र समिती, अ.भा.अण्णाद्रमुक, बिजु जनता दल इत्यादी प्रादेशिक पक्षांनीही भाजपला साथ दिलेली आहे. त्यामुळे बेरजेच्या या गणितात ‘रालोआ’चे उमेदवार कोविंद हे आघाडी घेतील. नवी दिल्लीला गेलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी चक्क शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आणि चर्चा केल्याने विरोधी पक्षात त्यावर खमंग चर्चा सुरू झाली. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसबरोबर आहे. या पक्षाची ताकद आता फारशी राहिलेली नसली तरी एक राजकीय पक्ष या नात्याने विरोधी पक्षांना त्याचे महत्त्व आहे. कोविंद यांच्यापेक्षा मीराकुमार या देशाला सुपरिचित निश्चितच आहेत. भले बहुमत त्यांच्या पाठीशी नसेल परंतु या निवडणुकीच्या निमित्ताने कोण किती पाण्यात आहे याची जाणीव होईल. मोदींविरोधात व भाजप विरोधात विरोधकांची मोट ही कितपत एकत्र राहील याचे चित्र आज काढता येणार नाही परंतु ही सुरुवात आहे. हेही नसे थोडके…! मीराकुमार यांच्या उमेदवारीने निवडणुकीत मात्र निश्चितच रंग आला आहे.

 

Related posts: