|Thursday, August 22, 2019
You are here: Home » क्रिडा » विराट स्वतःला बॉस समजत असेल, तर प्रशिक्षकाची गरजच काय?

विराट स्वतःला बॉस समजत असेल, तर प्रशिक्षकाची गरजच काय? 

माजी ऑफस्पिनर इरापल्ली प्रसन्ना यांची भारतीय कर्णधारावर खरमरीत टीका

वृत्तसंस्था / कोलकाता

‘विद्यमान भारतीय कर्णधार विराट कोहली स्वतःला भारतीय क्रिकेटचा ‘बॉस’ समजत असेल तर भारतीय क्रिकेट संघाला प्रशिक्षकाची अजिबात गरज नाही’, असे संतप्त विधान माजी ऑफस्पिनर इरापल्ली प्रसन्ना यांनी करत विराटवरील नाराजी तीव्र शब्दात मांडली. विराटसारखा कर्णधार असताना भारतीय संघाला फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची देखील गरज नाही, असे ते पुढे म्हणाले.

‘कोहली उत्तम खेळाडू आहे, यात वाद नाही. मात्र, तो उत्तम कर्णधार आहे की नाही, याबद्दल मला फारशी कल्पना नाही’, असे प्रसन्ना यावेळी म्हणाले. आयसीसी चॅम्पियन्स चषकाच्या फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताने नामुष्कीजनक पराभव स्वीकारला आणि त्यानंतर कुंबळे यांनी कोहलीला आपल्या शैलीबद्दल आक्षेप असल्याने आपण मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. सध्या भारताचा संघ प्रशिक्षकाविनाच वेस्ट इंडीजमध्ये खेळत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रसन्ना बोलत होते.

‘अनिल कुंबळेसारख्या महान खेळाडूला विराट सन्मान देत नसेल तर संजय बांगर, आर. श्रीधर यांच्यासारखे प्रशिक्षक विद्यमान भारतीय कर्णधाराशी विश्वासाने बोलू देखील शकणार नाहीत. कारण, त्यांच्याकडे कुंबळेइतका अनुभव अजिबात नाही. एकंदरीत परिस्थिती पाहता, भारतीय संघाने फक्त फिजिकल ट्रेनिंगसाठी कोणाला तरी नियुक्त करावे आणि विराटची क्षमता पाहता ते पुरेसे आहे’, असे 77 वर्षीय प्रसन्ना पुढे म्हणाले.

युवराज सिंग व महेंद्रसिंग धोनी 2019 च्या विश्वचषकापर्यंत खेळू शकतील, असे वाटत नाही. त्यामुळे, त्यांच्याबाबत आताच निर्णय घेणे योग्य, या राहुल द्रविडच्या मताचाही प्रसन्ना यांनी यावेळी पुनरुच्चार केला. ‘धोनी यष्टीरक्षक या नात्याने उत्तम आहे. पण, क्षेत्ररक्षक या नात्याने युवराज संघावर सक्तीने लादलेले ओझेच ठरत आहे. विंडीजचा संघ सर्वात दुर्बळ असल्याने भारताला येथे नवोदित खेळाडूंना खेळवण्याची नामी संधी होती. पण, ती त्यांनी गमावली आहे’, असे प्रसन्ना शेवटी म्हणाले.