|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कौशल्यातून रोजगार देणे मोठे काम!

कौशल्यातून रोजगार देणे मोठे काम! 

कुडाळ : कौशल्याशिवाय रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही. हे सूत्र जाणून केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी मानव साधन विकास संस्थेच्या माध्यमातून काम सुरू केले. सामाजिक दृष्टिकोनातून बेरोजगारांमध्ये समृद्धी आणण्यासाठी काम करणारी देशातील ग्रामीण भागातील ही पहिली संस्था आहे. कौशल्यातून रोजगार देणे विकास प्रक्रियेतील मोठे काम आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे काढले.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी आलेले मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अन्य मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत मानव साधन विकास संस्था (मुंबई) संचलित जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग (मनुष्यबळ विकास मंत्रालय, भारत सरकार पुरस्कृत) रिसोर्स सेंटरच्या इमारतीचे भूमिपूजन व कॉलेज ऑफ नर्सिंगच्या (अणाव) बहुउद्देशीय सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. येथील मराठा समाज सभागृहात हा कार्यक्रम रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्यावेळी फडणवीस बोलत होते.

व्यासपीठावर केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, केंद्रीय उद्योगमंत्री अनंत गिते, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार वैभव नाईक, माजी आमदार पुष्पसेन सावंत, शिवराम दळवी व राजन तेली, संदेश पारकर, मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा उमा प्रभू, जन शिक्षण संस्थानचे (सिंधुदुर्ग) अध्यक्ष डॉ. शरद सावंत तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. संस्थेने आतापर्यंत कौशल्य प्रशिक्षणातून बेरोजगारांसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती स्लाईड शोद्वारे देण्यात आली. संस्थेच्या या कार्याचे मान्यवरांनी कौतुक केले.

फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्याचे महत्व पटवून देताना कौशल्यामुळे देश प्रगतीपथावर जाऊ शकतो, असे सूचित केले होते. पण त्यापूर्वी प्रभू यांना कौशल्याशिवाय रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही, ही कल्पना सूचली आणि त्यांनी संस्थेच्या माध्यमातून काम सुरू केले. विविध प्रशिक्षणांतून बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचे चांगले काम उभे केले आहे. सौ. प्रभू या संस्थेचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळत आहेत. कोकणातील बेरोजगारांना कौशल्याच्या माध्यमातून दिशा देण्याचे काम सुरू आहे. या रोजगाराभिमुख कामाला तोड नाही. आतापर्यंत या संस्थेने 40 हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे मोठे काम केले आहे.

प्रभू यांनी संस्थेचा उद्देश व्यक्त केला. डॉ. सावंत यांनी संस्थेच्या आतापर्यंतच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी संस्था सभासद, बचतगटातील महिला, युवक-युवती उपस्थित होते. नकुल पार्सेकर यांनी आभार मानले.