|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वैशिष्टय़पूर्ण योजना कामांचा शुभारंभ

वैशिष्टय़पूर्ण योजना कामांचा शुभारंभ 

मालवण : वैशिष्टय़पूर्ण योजनेसाठी उपलब्ध झालेल्या दोन कोटी दहा लाख रुपयांच्या निधीतून मालवण शहरातील पर्यटनदृष्टय़ा महत्वाच्या अशा पाच ठिकाणी करण्यात येणाऱया कामांचा शुभारंभ रॉक गार्डन येथे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मुख्याधिकारी रंजना गगे, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, नगरसेवक यतीन खोत, गणेश कुशे, दीपक पाटकर, बांधकाम सभापती सेजल परब, महिला व बालकल्याण सभापती तृप्ती मयेकर, नगरसेविका आकांक्षा शिरपुटे, सुनीता जाधव, ममता वराडकर, शीला गिरकर, दर्शना कासवकर, भाई कासवकर, महेंद्र पाटील, कांचन पाटील, परुळेकर, जगदीश गावकर, यशवंत मालंडकर, उमेश हर्डीकर, नीतेश पेडणेकर आदी उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष कांदळगावकर म्हणाले, राज्य शासनाच्या वैशिष्टय़पूर्ण योजतेनील सव्वाकोटी रुपयांचा निधी एलईडीवर खर्च करण्यात आला. आता उर्वरित दोन कोटी दहा लाखांचा निधी पर्यटनदृष्टय़ा महत्वाच्या असणाऱया रॉक गार्डन, चिवला बीच, बंदरजेटी, मोरयाचा धोंडा, हेरिटेज मंदिर ही पाच ठिकाणे प्रकाशमान करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

या योजनेविषयी माहिती देताना अभियंता महेंद्र पाटील व कांचन पाटील म्हणाल्या, या निधीतून रॉक गार्डन येथे पाथवे हायलाइटर होणार आहेत. तसेच एक हायमास्ट टॉवरदेखील उभारण्यात येणार आहे. मुंबई येथील सीएसटीच्या धर्तीवर लाल, हिरवा, निळा या तीन रंगांचा समावेश असलेल्या लाईटचा वापर करून रॉक गार्डनला आकर्षक रुप देण्यात येणार आहे. तसेच रॉक गार्डनमधील झाडांवर फ्लड लाईट्सही टाकण्यात येणार आहेत. तसेच चिवला बीचवर मच्छीमारांना त्रास होणार नाही, अशाप्रकारच्या लाईट्सचा वापर करून चिवला बीच प्रकाशमान केले जाणार आहेत. येत्या आठ महिन्यात ही सर्व कामे पूर्ण होणार आहेत.