|Monday, November 19, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सहाय्यक व्यवस्थेवर लष्कराकडून पुनर्विचार

सहाय्यक व्यवस्थेवर लष्कराकडून पुनर्विचार 

वृत्तसंस्था/ श्रीनगर

लष्कर आता ब्रिटिशकालीन सहाय्यक व्यवस्थेत सामान्य नागरिकांची भरती करण्यावर विचार करत आहे. मागील काही काळात अनेक सैनिकांनी उघडपणे या सहाय्यक व्यवस्थेप्रति नाराजी व्यक्त केली आहे. अधिकारी आपल्या सहाय्यकाला खासगी नोकरासमान वर्तणूक देतात असा आरोप अनेकांकडून झाला आहे. सैनिकांचा विरोध पाहता लष्कर आता सामान्य नागरिकांना सहाय्यक म्हणून नियुक्त करण्याचा विचार करत आहे.

सहाय्यक व्यवस्थेत अधिकाऱयांना सहाय्य आणि उर्वरित कामांसाठी सहाय्यक या नात्याने एक सैनिक उपलब्ध करविला जातो. सहाय्यक म्हणून नियुक्त करण्याप्रकरणी मोठय़ा संख्येत सैनिकांद्वारे विरोध दर्शविण्यात आल्यानंतर लष्कर आता या मुद्यावर गांभीर्याने विचार करत आहे.

मुख्य लष्करी तळ आणि महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये ही सहाय्यक व्यवस्था कायम राहणार आहे. लष्करात सहाय्यकांची जबाबदारी देखील निश्चित आहे. अशा स्थितीत सहाय्यकांना हटविण्यात आल्याने एक रिक्त पद निर्माण होईल. शांतिपूर्ण भागात सामान्य नागरिकांना सहाय्यकपदी भरती करण्याचा विचार सुरू असल्याचे लष्करी अधिकाऱयाने सांगितले आहे.

 परंतु हा बदल केवळ शांततापूर्ण भागांमधील लष्करी तळांमध्येच करण्याचा विचार होतोय. तणावग्रस्त क्षेत्रात हा बदल अशक्य आणि अव्यवहार्य असल्याचे लष्कराचे म्हणणे आहे.

मागील काही महिन्यांमध्ये अशा अनेक चित्रफिती समोर आल्या आहेत, ज्यात लष्कराचे सैनिक सहाय्यक व्यवस्थेप्रति नाराजी व्यक्त करताना दिसून आले आहेत.

 

अधिकारी आपल्या सहाय्यकासोबत नोकरासारखे वर्तन करतात असा काही जणांनी आरोप केला आहे. याचवर्षी मार्चमध्ये केंद्र सरकारने लष्कराच्या सहाय्यक व्यवस्थेचे जोरदार समर्थन केले होते.

लष्करी अधिकाऱयाला आपली जबाबदारी नीटपणे पार पाडता यावी, यासाठी सहाय्यकांची खूपच महत्त्वाची भूमिका असते. सहाय्यकांकडून अपमानास्पद काम न करविण्याचा निर्देश अधिकाऱयांना देण्यात आला आहे. सहाय्यक लष्कराचेच सैनिक असतात आणि त्यांची जबाबदारी अधिकाऱयांची सुरक्षा करणे असते. त्यांच्या शस्त्रास्त्राची आणि उपकरणांची देखभाल करणे असते असा युक्तिवाद सरकारकडून करण्यात आला होता.

Related posts: