|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » काश्मीरप्रश्नी सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन चर्चा करावी !

काश्मीरप्रश्नी सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन चर्चा करावी ! 

पुणे / प्रतिनिधी

काश्मीरची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून, तेथील राज्य सरकारने हा विषय वेगळय़ा पद्धतीने हाताळण्याची गरज आहे. सीमेचे रक्षण काळजीपूर्वक करण्याची आवश्यकता असून, आता गावापर्यंत हे लोण माजण्यास सुरुवात झाली आहे. दहशतवाद्यांना सीमेच्या आतमध्ये येऊ न देण्याची उपाययोजना करण्याची गरज आहे. याबाबत देशातील सर्व राजकीय पक्षांनी केंद्र सरकारसोबत चर्चा करण्याची पूर्ण तयारी दर्शविली असल्याचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी रविवार येथे सांगितले.

याबाबत पवार म्हणाले, काश्मीरमधील रहिवाशांची काही तक्रार नाही. परंतु, सेनेचे जवान रात्री 2 ते 3 वाजता तेथील लोकांच्या घरात जातात. त्यामुळे तेथील लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. तेथील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. बाहेरून तेथे येणाऱया लोकांचा त्रास थांबविण्याची गरज आहे. हा आंतरराष्ट्रीय प्रश्न असून, यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन केंद्र सरकारसोबत चर्चा करून तो सोडविला पाहिजे.

देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्र्यांची गरज

सध्या सीमेवरील परिस्थिती पाहिल्यास देशाला पूर्णवेळ संरक्षणमंत्र्याची गरज आहे. तरीदेखील केंद्र सरकार त्याची नेमणूक का करत नाही? ते समजत नाही. काश्मीरची परिस्थिती देशातील असुरक्षित सीमा आणि पाकिस्तानला धडा शिकविण्याची गरज या सर्व गोष्टी लक्षात घेता देशाला संरक्षणमंत्र्यांची गरज आहे. याबरोबर देशातील जवानांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी तसेच त्यांना प्रोत्साहित करण्यासाठीदेखील पूर्णवेळ संरक्षणमंत्री हवा आहे.

मीरा कुमार राष्ट्रपतिपदासाठी योग्य उमेदवार

राष्ट्रपतिपदाबाबतचा निकाल काय लागणार, ते सर्वांनाच माहिती आहे. पण भाजप आणि एनडीए ज्याप्रमाणे रामनाथ कोविंद यांना दलित नेता म्हणून प्रमोट करीत आहेत. यावरून ही लोकशाहीच आहे काय, असा प्रश्न पडतो आहे. खरे तर प्रणव मुखर्जी यांच्यासमोर नारायण हा दलित चेहराच होता. एनडीएकडून मुरली मनोहर जोशी यांचा चेहरा समोर येईल, असे वाटले. परंतु, त्यांचा दुसरा क्रायटेरिया असेल. मी जर राष्ट्रपतिपदाच्या शर्यतीत असतो, तर तुमच्यासमोर असा  दिसलो नसतो. या पदासाठी मीरा कुमार या आमच्या योग्य उमेदवार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

ईडीमार्फत चौकशी करावयाची असेल, तर अवश्य करावी

सध्या ईडीमार्फत माजी केंद्रीय मंत्री चिदंबरम यांच्यासह अनेकांची चौकशी सुरू असल्याचे दिसत आहे. याबाबत पवारांना विचारले असता ते म्हणाले, ईडीमार्फत माझी चौकशी करायची असल्यास अवश्य करावी.