|Friday, October 19, 2018
You are here: Home » क्रिडा » इंग्लंडचा मालिकाविजय

इंग्लंडचा मालिकाविजय 

कार्डिफ :

 डेव्हिड मालनची तुफानी फटकेबाजी (44 चेंडूत 78) व ख्रिस जॉर्डन (3/31), टॉम करन (2/22) यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर यजमान इंग्लंडने तिसऱया टी-20 सामन्यात द.आफ्रिकेवर 19 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 20 षटकांत 8 गडी गमावत 181 धावा केल्या. प्रत्युतरादाखल खेळणाऱया द.आफ्रिकेला मात्र निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावत 162 धावापर्यंतच मजल मारता आली. शानदार अर्धशतकी खेळी साकारणाऱया डेव्हिड मालनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतान दक्षिण आफ्रिकेची खराब सुरुवात झाली. सलामीवीर रजा हेंड्रिक्सला दुसऱयाच षटकांत करनने बाद करत आफ्रिकेला पहिला धक्का दिला.

 यानंतर, ख्रिस मॉरिस (8), जे स्मट्स (29) धावांवर बाद झाल्याने आफ्रिकेची 3 बाद 59 अशी स्थिती झाली होती. कर्णधार डीव्हिलीयर्सने 19 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारासह 35 धावा फटकावत संघाला शतकी मजल मारुन दिली. मधल्या फळीतील डेव्हिड मिलर (7), बेहर्दीन (3) लागोपाठ बाद झाल्यामुळे आफ्रिकेच्या धावसंख्येला लगाम बसला. मोश्ले (22 चेंडूत 36) व फुलकियो (नाबाद 27) यांनी शेवटच्या दोन षटकांत फटकेबाजी केली, पण तोपर्यंत उशीर झाला होता. द.आफ्रिकेला 20 षटकांत 7 गडी गमावत 162 धावापर्यंत मजल मारता आली. इंग्लंडतर्फे ख्रिस जॉर्डनने 3 तर टॉम करनने 2 गडी बाद केले.

तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकन कर्णधार एबी डीव्हिलीयर्सने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या डावाची खराब सुरुवात झाली. सलामीवीर जेसन रॉय 8 धावा काढून बाद झाला. यानंतर, ऍलेक्स हेल्स व युवा डेव्हिड मिलन जोडीने दुसऱया गडय़ासाठी 105 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. ऍलेक्स हेल्सने 28 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारासह 36 धावांचे योगदान दिले. फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात तो फुलकियोच्या गोलंदाजीवर बाद झाला. युवा मिलननेही शानदार अर्धशतकी खेळी साकारताना आफ्रिकन गोलंदाजाची चांगलीच धुलाई केली. मिलनने 44 चेंडूत 12 चौकार व 2 षटकारासह 78 धावा फटकावल्या.

हेल्स-मिलन जोडी लागोपाठ बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या धावसंख्येला लगाम बसला. जोस बटलरने 22 चेंडूत 1 चौकार व 2 षटकारासह 31 धावांची खेळी साकारत संघाला दीडशतकी मजल मारुन दिली. सॅम बिलिंग्जने 12 धावांचे योगदान दिले. चांगल्या सुरुवातीनंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केल्यामुळे इंग्लंडला मोठी धावसंख्या रचण्यात अपयश आले. दक्षिण आफ्रिकेतर्फे डॅन पीटरसनने 32 धावांत 4 गडी बाद केले. फुलकियोने 2 तर मॉर्कल व इम्रान ताहीर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : इंग्लंड 20 षटकांत 8 बाद 181 (जेसन रॉय 8, ऍलेक्स हेल्स 28 चेंडूत 36, डेव्हिड मालन 44 चेंडूत  78, जोस बटलर 22 चेंडूत 31, सॅम बिलिंग्ज 12, डॅन पीटरसन 32 धावांत 4 बळी, फुलकियो 44 धावांत 2 बळी).

दक्षिण आफ्रिका : 20 षटकांत 7 बाद 162 (जे स्मट्स 29, डीव्हिलीयर्स 35, मोश्ले 36, फुलकियो नाबाद 27, ख्रिस जॉर्डन 3/31, टॉम करन 2/22, प्लंकेट 1/22).

Related posts: