|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तीन वाहने फोडली, घरावर दगडफेक : पाच जखमी

तीन वाहने फोडली, घरावर दगडफेक : पाच जखमी 

प्रतिनिधी/ सांगली

 राजकीय वर्चस्व निर्माण करणे आणि राजकीय वजन टिकवण्यावरून गेल्या काही दिवसांपासून मिरज तालुक्यातील हरिपूरमध्ये सुरू असलेल्या धुसफुसीचा रविवारी स्फोट झाला. बोंद्रे आणि फाकडे गटात राडा झाला. सिनेस्टाईलने पाठलाग करून मारामारी करण्यात आली. यामध्ये पाच जण जखमी झाले असून यामध्ये तीन वाहने फोडण्यात आली आहेत. तर घरांवरही दगडफेक करून दरवाजे मोडण्यात आले आहेत. दोन्ही गटाच्या 49 जणांवर सांगली शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दोन्ही गटाच्या सहा जणांना अटक केली आहे. त्यामुळे हरिपुरात तणाव निर्माण झाला असून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात  करण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी दुचाकी आडवी मारल्याच्या कारणावरून अंकलीत झालेल्या मारामारीवरून रविवारी भडका उडाल्याचे सांगण्यात आले.

याबाबत घटनास्थळ आणि पोलिसातून मिळालेली माहिती अशी, हरिपूरमध्ये अनेक वर्षापासून मोहिते आणि बोंद्रे गटात राजकीय स्पर्धा आणि त्यातून वादावादी सुरू आहे. गतवेळी ग्रामपंचायत निवडणुकीनंतरही असाच मोठा राडा झाला होता. तेव्हापासून वाद कमी होण्याऐवजी वाढतच आहे. मोहिते गटाचे माजी उपसरपंच गजानन फाकडे यांच्या कुटुंबातील एक युवक हरिपूर अंकली रोडवरून भरधाव वेगाने दुचाकी चालवत येत होता. त्यावरून बोंद्रे गटातील तिघा ते चौघाबरोबर त्याचा वाद झाला होता. त्यातूनच अंकली येथे त्याला मारहाण झाली होती. तीन दिवसांपूर्वी अंकलीत घडलेल्या या घटनेनंतर सांगली ग्रामीण पोलिसांनी तक्रार देण्याचे आवाहन केले होते.पण कोणीही तक्रार दिली नव्हती. त्यानंतर पोलिसांनी गावात बंदोबस्त ठेवला होता. शनिवारीही यावरूनच किरकोळ वादावादी झाली होती.

रविवारी सकाळी याच कारणावरून हरिपूरहून सांगलीला येणाऱया फाकडे कुटुंबातील एका युवकाला बोंद्रे गटातील युवकांनी अडवून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पण, तो युवक दुचाकी रस्त्यावरच टाकून जवळच असणाऱया नामदेवराव मोहिते यांच्या बंगल्यात पळाल्याने वाचला. त्याने आपल्यावर हल्ल्याची माहिती मोबाईलवरून गावातील युवकांना दिली. त्यामुळे फाकडे गटाचे वीस ते पंचवीस युवकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. फाकडे गटाच्या युवकांना पाहताच बोंद्रे गटाच्या युवकांनी सांगलीकडे धुम ठोकली. दरम्यानच्या काळात जवळच असणाऱया विकास बोंद्रे यांची स्कार्पिओ क्र.एम.एच. 11सीके 8064 ही स्कॉर्पिओ फाकडे गटाच्या युवकांनी फोडली. याची माहिती सांगलीच्या दिशेने आलेल्या बोंद्रे गटाच्या युवकांना समजल्यानंतर त्यांनी गजानन फाकडे यांची स्कॉर्पिओ (क्र. एम.एच. 10 ए.जी.1557) कोल्हापूर रोडवर साईनाथ ऑटोमोबाईलसमोर अडवली. लोखंडी गज आणि दांडक्यांनी गाडीच्या काचा फोडल्या. गाडीतून पळून जाणाऱया गजानन फाकडे, त्यांचा मुलगा सचिन आणि पुतण्या सुरज यांना मारहाण केली. त्याचबरोबर फाकडे कुटुंबातील ओमनी (क्र.एम.एच.12 एचएफ 4988) सांगली हरिपूर रस्त्यावर अरविंद तांबवेकर यांच्या घरासमोर फोडली.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे हरिपूर आणि सांगलीत शास्त्री चौकात एकच तणाव निर्माण झाला. पोलीस उपाधीक्षक दीपाली काळे यांनी घटनास्थळी फौजफाटय़ासह धाव घेतली. त्यानंतर ग्रामीण पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे, सांगली शहरचे पो.निरीक्षक शेळके यांनीही हरिपूरच्या दिशेने धाव घेतली. मोठय़ा प्रमाणावर पोलीस कुमक हरिपुरात दाखल झाल्याने हरिपूरला जणू पोलीस छावणीचेच स्वरूप आले होते. दिवसभर गावात तणाव निर्माण  झाला होता. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

       49 जणांवर गुन्हा

दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत. बोंद्रे गटाचे भाजपा नेते अरविंद तांबवेकर आणि उपसरपंच गजानन फाकडे यांच्यासह 49 जणांवर सांगली ग्रामीण आणि शहर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सांगली शहर पोलीस ठाण्यात सचिन गजानन फाकडे वय 30 याने दिलेल्या फिर्यादीनुसार सहा दुचाकीवरून आलेल्या बोंद्रे गटाच्या चौदा जणांनी कोल्हापूर रोडवर आपल्यासह वडील गजानन फाकडे, चुलत भाऊ सूरज फाकडे यांना मारहाण करून गाडीच्या काचा फोडल्याची तक्रार केली आहे. त्यामध्ये तिघेही जखमी झाले आहेत. सचिनने दिलेल्या फिर्यादीत बंडू दिनकर बोंद्रे, अरविंद गोविंद तांबवेकर, दिग्विजय कुंडलीक बोंद्रे, विकास मनोहर बोंद्रे, युवराज मनोहर बोंद्रे, आशिष शामराव बोंद्रे, कुमार बोंद्रे, योगेश बोंद्रे, सागर बोंद्रे, प्रतीक कुमार बोंद्रे, परशुराम सुनिल साखळकर, अक्षय बाळासाहेब बोंद्रे, विनोद पवार आणि अभिनव अरविंद तांबवेकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

      सांगली ग्रामीणला परस्परविरोधी फिर्यादी

 सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. राजकीय वर्चस्वासाठी गावात दहशत निर्माण करण्याच्या हेतूने दोन्ही गटात राडा झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांनी दिली. गजानन हरि फाकडे वय 54 यांनी दिलेल्या फिर्यादीत आपला पुतण्या सनी फाकडे हा सांगलीला येत असताना त्याची ओमनी गाडी अडवून अकरा जणांनी फोडली असल्याचे म्हटले आहे. महेश दिनकर बोंद्रे, निशिकांत बोंद्रे, विरेंद्र नारायण तांबवेकर, दिग्वीजय बोंद्रे, विकास बोंद्रे, कुमार बोंदे, संतोष प्रकाश बोंद्रे, विनोद महादेव पवार, योगेश बोंद्रे, दामोदर इंदर बोंद्रे, अभिषेक बोंद्रे, आशिष शामराव बोंद्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  तर विकास मनोहर बोंद्रे वय 34 याने दिलेल्या फिर्यादीनुसार गजानन फाकडे, सागर फाकडे, सूरज फाकडे, नरसू फाकडे, सचिन फाकडे, अनिल सदाशिव फाकडे, सुनील फाकडे, धिरज नरसू फाकडे, शुभम फाकडे, सौरभ परशुराम फाकडे, अरूण फाकडे, सनी फाकडे, अनिल फाकडे, शेखर फाकडे, चिक्कू फाकडे, लखन फाकडे, परसु फाकडे, निरेश फाकडे, निरज फाकडे, अक्षय राजेंद्र फाकडे, अक्षय फाकडे,संभाजी फाकडे यांची दोन मुले यांच्यासह दहा ते पंधरा अनोळखी वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related posts: