|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » खाण घोटाळाप्रकरण सीबीआयकडे सोपविणार

खाण घोटाळाप्रकरण सीबीआयकडे सोपविणार 

प्रतिनिधी/ पणजी

राज्यातील कोटय़वधी रुपयांच्या खाण घोटाळ्य़ाचे प्रकरण एसआयटीकडून काढून घेऊन सीबीआयकडे सोपविण्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रयत्न चालू केले असल्यामुळे राज्यातील खाण मालकांना मोठा दणका बसण्याची शक्यता आहे.

कोटय़वधी रुपयांचा खाण घोटाळा प्रकरणाची चौकशी सध्या एसआयटीमार्फत चालू आहे. शहा आयोगाने राज्यातील खाण घोटाळा हा सुमारे 35 हजार कोटी रु.चा आहे, असा अहवाल यापूर्वीच 2012 मध्ये सादर केला होता. त्यानंतर या घोटाळ्य़ाची विविध पातळीवर चौकशी चालू करण्यात आली. तर गेल्या वर्षभरापूर्वी हे प्रकरण एसआयटीकडे सोपविण्यात आले. एसआयटीने थोडे कडक धोरण धरल्यानंतर याप्रकरणातील बरीच माहिती उघड होऊ लागली. यातून अनेक खाण उद्योजक अडचणीत आले खरे परंतु राज्य सरकारकडे पाहिजे तेवढी तपास यंत्रणा नसल्यामुळे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी हे प्रकरण आता सीबीआयकडे देण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय अलिकडेच घेतला आहे. या संदर्भात पुढील आठवडय़ात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहून खाण घोटाळा प्रकरण सीबीआयकडे देत असून सीबीआयने हे प्रकरण हाती घ्यावे व संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करावी, अशी मागणी करणार आहेत.

 खाण मालकांत घबराट

प्राप्त माहितीनुसार, मुख्यमंत्री खाण घोटाळ्य़ाचे प्रकरण सीबीआयकडे सोपविणार असल्याचे वृत्त काही खाण मालकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांच्यात आता खबराट पसरली आहे. मुख्यमंत्र्यांनी खाण घोटाळ्य़ातील वसूल करण्यासाठी अत्यंत कडक अवलंबिण्याचा निर्णय हा गेल्या आठवडय़ात घेतला. एसआयटीने आतापर्यंत सुरु केलेल्या तपास कार्यामुळे राज्य सरकारला काही कोटी रुपयांचा महसूल मिळेल असा अंदाज होता, परंतु हे पैसे वसूल कसे करावे तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यास आणखीन बराच कालावधी लागेल. यामुळे मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याचे ठरविले आहे.