|Monday, October 22, 2018
You are here: Home » क्रिडा » जर्मनी, चिलीची शेवटच्या चारमध्ये धडक

जर्मनी, चिलीची शेवटच्या चारमध्ये धडक 

कॉन्फेडरेशन्स चषक फुटबॉल : जर्मनीची कॅमेरूनवर मात, ऑस्ट्रेलियाने चिलीला गोलबरोबरीत रोखले

वृत्तसंस्था / सोची, रशिया

जर्मनीने कॉन्फेडरेशन्स चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविताना कॅमेरूनचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यावेळी मैदानी पंचांना एकाच घटनेच्या निर्णयासाठी दोनदा व्हिडिओ रेफरलची (व्हीएआर) मदत घ्यावी लागली. अन्य एका सामन्यात चिलीला ऑस्ट्रेलियाने 1-1 असे बरोबरीत रोखले असले तरी चिलीला उपांत्य फेरीत स्थान मिळाले.

जर्मनी-कॅमेरून यांच्यातील सामन्यावेळी मैदानी पंचांना दोनदा व्हिडिओ रेफरलची मदत घ्यावी लागली. कॅमेरूनच्या अर्नेस्ट मोबुकाने जर्मनीच्या एमरे कॅनवर चुकीच्या पद्धतीने चॅलेंज केल्यानंतर कोलंबियन रेफरी विल्मार रॉल्डन यांनी व्हिडिओ असिस्टंट रेफरीची मदत घेतली आणि त्यांनी चुकून सेबॅस्टियन सियानीला पिवळे कार्ड दाखविले. त्यावर कडी म्हणजे रॉल्डन यांनीही या चुकीत आणखी भर घालताना सियानीला पिवळय़ाऐवजी लाल कार्ड दाखविले. या अन्यायी निर्णयाविरोधात कॅमेरूनच्या खेळाडूंनी निषेध करीत पंचांना पुन्हा एकदा व्हिडिओ रिव्हय़ू घेण्याचा आग्रह केला. या रिव्हय़ूमध्ये रॉल्डन यांना आपली चूक कळाली आणि त्यांनी सियानीविरुद्ध दिलेला निर्णय रद्द करून खरोखरच दोषी असलेल्या मोबुकाला लाल कार्ड दाखवून बाहेर घालविले.

या विजयानंतर जर्मनीने गट ब मध्ये आघाडीचे स्थान मिळविले असून उपांत्य फेरीत त्यांचा मुकाबला याच ठिकाणी मेक्सिकोविरुद्ध गुरुवारी होणार आहे. येथील सामन्यात केरेम डेमिरबे व टिमो वेर्नर यांनी पहिले आंतरराष्ट्रीय गोल नोंदवले. यापैकी वेर्नरने दोन गोल नोंदवले. कॅमेरूनचा एकमेव गोल व्हिन्सेट अबुबाकरने नोंदवला. जर्मनीचे प्रशिक्षक जोआकिम लू यांचा हा 150 व्या सामन्यातील 100 वा विजय होता.

बरोबरी तरीही चिली उपांत्य फेरीत

चिलीनेही ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना 1-1 असा बरोबरीत ठेवत शेवटच्या चारमधील स्थान निश्चित केले. ऑस्ट्रेलियाला पुढील फेरी गाठण्यासाठी हा सामना दोन गोलांच्या फरकाने जिंकण्याची गरज होती. पण त्यांनी मिळालेल्या संधी वाया घालविल्याने त्यांना स्पर्धेबाहेर पडावे लागले.

ऑस्ट्रेलियाने 42 व्या मिनिटाला आघाडी घेत आशा निर्माण केल्या होत्या. जेम्स ट्रॉयसीने हा गोल नोंदवला. मध्यंतराआधी त्यांना ही आघाडी वाढविण्याची चांगली मिळाली होती. पण टेंट सेन्सबरीने मारलेली वाईल्ड व्हॉली बारवरून बाहेर गेल्याने ही संधी वाया गेली. 67 व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाच्या बचावफळीतील त्रुटीचा लाभ घेत बदली खेळाडू मार्टिन रॉड्रिगेझने गोल नोंदवून चिलीला बरोबरी साधून दिली. ऑस्ट्रेलियाच्या टिम काहिलचा हा शंभरावा सामना होता. उत्तरार्धात त्यानेही आघाडी घेण्याची संधी वाया घालविली. चिलीचा उपांत्य सामना बुधवारी युरोपियन चॅम्पियन पोर्तुगालशी होणार आहे. येथील सामन्यानंतर गट ब मध्ये चिलीने 5 गुणांसह दुसरे स्थान मिळविले तर ऑस्ट्रेलिया 2 गुणांसह तिसऱया स्थानी आहे.

चिलीने या सामन्यात वेगवान व आक्रमक खेळ केला. अर्टुरो विडालने सुरुवातीलाच शानदार व्हॉली गोलच्या दिशेने मारली होती. पण मॅटी रेयानने अप्रतिम बचाव केला. ऍलेक्सिस सांचेज चेंडू व्यवस्थित क्लीअर केला. पण रेयान मिलिगनच्या अखेरच्या क्षणी केलेल्या टॅकलमुळे चेंडू त्याच्या पावलावर लागून उडाला होता. यावेळी सांचेज अडखळून पडल्यावर चिलीने पेनल्टीसाठी अपील केले. पण व्हिडिओ असिस्टंट रेफरींनी मिलिगनचे टॅकल आक्षेपार्ह नसल्याचे सांगून चिलीचे अपील फेटाळले. यानंतर ऑस्ट्रेलियाने धसमुसळ खेळ करीत चिलीवर वर्चस्क् गाजविले. त्यामुळे मध्यंतराआधी त्यांच्या चार खेळाडूंना रेफरींनी बुक केले होते. याशिवाय 37 वषीय काहिलनेही चार्लस ऍराग्वीझला मागील बाजूने ढकलून पाडविले होते. पण सुदैवानेच रेफरींनी त्याला बाहेर घालविले नाही.

Related posts: