|Sunday, January 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » वळसंग ग्रामपंचायतीचा नुसताच एलईडीचा झगमगाट

वळसंग ग्रामपंचायतीचा नुसताच एलईडीचा झगमगाट 

वार्ताहर/ वळसंग

जत तालुक्यातील वळसंग येथील ग्रामपंचायतीकडे गावच्या विकासकामांसाठी पैसे उपलब्ध नसल्याची ओरड करणाऱया ग्रामपंचायतीकडे उधळपटटी करण्यासाठी मुबलक पैसा असल्याचे दिसून येत आहे. अनेक वर्षापासून ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी व वापरण्याच्या पाण्यासाठी व गावातील गटारीसाठी रस्त्यांच्या दुरावस्थे बाबत ओरड करीत आहेत. मात्र आवश्यक असणाऱया कामांकडे दुर्लक्ष करून ग्रामपंचायतीने गावात एलईडी दिव्यांचा झगमगाट व निकृष्ट दर्जाचे पेव्हिंग ब्लॉक गरज नसलेल्या रस्त्यावर बसवून गावच्या पैशाची चक्क उधळपटटी केली आहे.

गावात गटारी नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येत असल्याने गावामध्ये दुर्गंधी पसरली आहे. व गावातील ग्रामस्थ पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने गावापासून एक ते दोन किलोमीटर नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. पिण्याच्या पाण्यासाठी, गटारी व रस्ते बांधण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याचे सांगणाऱया ग्रामपंचायतीने चौका चौकात एलईडी दिवे बसवून नुसताच दिखावा केला आहे. वास्तविक या एलईडी दिव्यांची कोणतीही आवश्कता नव्हती. उलट या उजेडाचा उपयोग रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱया व्यावसायिकांनाच होत आहे.  एलईडी दिव्यामुळे त्यांची आयतीच सोय झाली आहे. स्टँन्ड चौक, ग्रामपंचायत चौक, केंचराय्या मंदिरासमोर, समाजमंदिरासमोर या ठिकाणच्या विदयुत खांबावरील चांगले असणारे व पुरेशे उजेड देणारे जुने बल्ब असतानाही एलईडी बल्ब बसविण्यात आले आहेत. काही ठराविक कारभारांच्या लाभासाठी हा उदयोग करीत असल्याची चर्चा ग्रामस्थांतून ऐकावयास मिळत आहे.

गावातील सावकार गल्ली, केंचराय्य मंदिर ते दलित वस्ती हे रस्ते अत्यंत खराब झाले असून रस्त्यावर मोठया प्रमाणात खडडे पडले असल्याने सांडपाणी थांबून दुर्गधी पसरली आहे. डांसांच्या प्रमाणात वाढ होत आहे. या रस्त्याची दुरूस्ती, सांडपाण्यासाठी गटारी, पिण्यासाठी पाण्याची सोय करण्याचे सोडून गरज नसताना गावाचा विकास दाखविण्यासाठी मारूती मंदिर ते केंचराया मंदिर, ग्रामपंचायत ते पाटील चव्हाण गल्लीत दर्जेदार गटारीची बांधकाम न करता निकृष्ठ दर्जाचे पेव्हिंग ब्लॉक बसविल्याने नागरिकांना सांडपाण्यातून रस्ता काढत असताना पेव्हिंग ब्लॉकवर पाय देताना पाणी नागरिकांच्या अंगावर उडत आहे. पेव्हिंग ब्लॉकचे निकृष्ठ दर्जाचे काम करून अक्षरश: विकास निधीची वाट लावली असल्याची माजी सरपंच शंकर टिळे यांनी तक्रार करून ग्रामपंचायतीच्या निकृष्ठ कामाचे पितळ उघडे पाडले आहे.

गावात जी विकास कामे केली आहेत तर काही कामे चालू आहेत त्याचा दर्जाही सुमार आहे. पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या आगोदर रस्त्याच्या दोन्ही बाजुनी चांगल्या दर्जाची गटारी बांधून सांडपाण्याची सोय करण्याची गरज होती. तसेच पिण्यासाठी मुबलक पाणी, दर्जेदार गटारी, गावातील खराब झालेल्या रस्त्यांची कामे करण्याची गरज असतानाही ग्रामपंचायतीने अशा एलईडीच्या झगमगाटावर पैशाची उधळपटटी करीत आहे. जनतेच्या पैशाची ही एक प्रकारची उधळपटटीच आहे. मात्र केवळ टक्केवारीवर डोळा ठेवून असणाऱया गेंडयाच्या कातडीच्या कारभारांना गावच्या विकासाचे सोयरसुतक नाही. आवश्यकता नसतानाही लावलेल्या एलईडीच्या बल्बच्या विज बिलाचा भार हा जनतेवरच पडणार आहे यात शंका नाही. सांडपाण्याने माखलेले रस्ते, पडलेले खडडे, एलईडी बल्बच्या उजेडात आणखीन उटून दिसणार आहेत. सावकार गल्लीतील केंचराय्या मंदिरासमोरील दलित वस्ती गावातील अनेक रस्त्यावरील सांडपाणी खडडे नागरिकांना व्यवस्थित दिसावेत व अडखळून घसरून पडू नयेत यासाठीच की काय ग्रामपंचायतीने एलईडी दिव्यांची सोय केली असावी असे नागरिकांतून बोलले जात आहे.

Related posts: