|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळुणातील वाळूवरील कारवाईचा व्यावसायिकांनी घेतलाय धसका

चिपळुणातील वाळूवरील कारवाईचा व्यावसायिकांनी घेतलाय धसका 

चोरटी वाहतूक बंद, साडेपाच लाखाचा ठोठावलेला दंडही भरला

प्रतिनिधी /चिपळूण

परवानगीपेक्षा जादा वाळूची वाहतूक करणारे 7 ट्रक पकडून त्यांच्याकडून साडेपाच लाख रूपयांचा दंड वसूल करण्याची धडक कारवाई येथील तहसीलदार जीवन देसाई यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केल्यानंतर याचा व्यावसायिकांनी धसका घेतला असून चोरटी वाहतूक बंद केली आहे. तसेच ठोठावलेला दंडही भरला आहे.

महाड येथून मोठय़ा प्रमाणात परवानगीपेक्षा जादा वाळूची पाटण, इस्लामपूर, कराड आदी ठिकाणी वाहतूक होत असल्याची माहिती देसाई यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी निवासी नायब तहसीलदार तानाजी शेजाळ, मंडल अधिकारी यू. एल. जाधव, तलाठी यू. आर. राजेशिर्के, माळी, गाढवे यांचे पथक नेमले होते. त्यानुसार या पथकाने वालोपे व खेर्डी येथे अशी वाहतूक करणारे सात ट्रक पकडले व त्यानुसार शंकर मोहन नलावडे, सचिन सर्जेराव सूर्यवंशी, रोहित अजित साळुंखे, अरूण दाजी पवार, अनंत रामचंद्र आखाडे, नारायण विष्णू साळुंखे यांना साडेपाच लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. त्यानुसार त्यांनी हा दंड भरला आहे. मात्र तहसीलदारांनीही सर्वात मोठी कारवाई केल्याने त्याचा व्यावसायिकांनी धसका घेतला असून चोरटी वाहतूक थांबवली आहे.

चिपळुणातही बेकायदा वाहतूक

सध्या येथील काही व्यावसायिकांकडेच वाळू उत्खननाचा परवाना आहे. त्यामुळे ते परवानगीपेक्षा अधिक उत्खनन करत असून गोवळकोट येथून या वाळूची उचल करून ती अन्य ठिकाणाहून बेकायदेशीरपणे वाहतूक करून विकली जात असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांवरही कारवाई करण्याची मागणी होत आहे.