|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार 

प्रतिनिधी/ निपाणी

बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास बसस्टॅण्डनजीक संभाजी चौकात घडली. योगेश चंद्रकांत जाधव (वय 32 रा. मंगळवार पेठ, निपाणी) असे मृत युवकाचे नाव आहे. या अपघातात दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले आहे.

घटनेविषयी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगळवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस क्र. (केए 27 एफ 618) ही हिरेकेरुर (हावेरी) हून पुण्याकडे जात होती. दरम्यान दुचाकीस्वार योगेश जाधव हा आपल्या दुचाकी क्र. (केए 23 एक्स 8426) वरून निपाणी स्टॅण्डच्या दिशेने जात होता. त्यावेळी भरधाव बसने दुचाकीस्वार योगेश याच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने तो जागीच गतप्राण झाला.

घटनेची माहिती मिळताच निपाणी शहर पोलीस ठाण्याचे फौजदार सुनील पाटील व हवालदार एम. जी. कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. कर्नाटक बसचालक प्रकाश बसवराज सावकार (वय 28) याला निपाणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

योगेश हा एकुलता असल्याने या घटनेमुळे जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. योगेशचा स्वभाव मनमिळावू होता. गणेशोत्सवाच्या काळात तो सर्वच कार्यक्रमात हिरीरीने सहभागी होत होता. त्याच्या निधनाची वार्ता बुधवारी सकाळी समजताच गांधी हॉस्पीटल व त्याच्या निवासस्थानी विविध मंडळाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. बुधवारी दुपारी 1 वाजता गांधी हॉस्पीटल येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतदेह पाहून नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. तो पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते. योगशच्या पश्चात पत्नी, आई-वडील, आजी, चुलते, दोन मुले, बहीण असा परिवार आहे. शुक्रवारी सकाळी 9 वाजता रक्षाविसर्जन करण्यात येणार आहे.

वाहनधारकांनी सतर्क राहण्याची गरज

गत महिनाभरात झालेले अनेक ठिकाणचे अपघात हे वाहनधारकांच्या दुर्लक्षामुळे झाले आहेत. वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे महत्त्वाचे असताना त्यातून होणाऱया दुर्लक्षाचा फटका दुसऱयाच्या जीवावर बेतणारा ठरत आहे. अपघाताच्या माध्यमातून होणारी हानी याचा विचार करुन वाहनधारकाने मार्गक्रमण करताना सतर्क राहणे गरजेचे बनले आहे.

 

Related posts: