|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » वीजप्रश्नी शिवसैनिकांकडून आचऱयात अधिकारी धारेवर

वीजप्रश्नी शिवसैनिकांकडून आचऱयात अधिकारी धारेवर 

आचरा :  वीज वितरणच्या गलथान कारभारामुळे आचरा, चिंदर, त्रिंबक, वायंगणी भागात  वारंवार खंडित होणाऱया वीजपुरवठय़ामुळे आचरा विभागातील शिवसैनिकांनी मालवण  तालुकाप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली येथील वीज वितरण कार्यालयात धडक देत अभियंता दीपक बुघडे यांना जाब विचारत धारेवर धरले. आचरा पंचक्रोशीतील ग्रामस्थ विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झाले होते. आचरा भागासाठी वीज वितरणचे कार्यालय असूनही  पंचक्रोशीतील वीज समस्या कमी होत नसल्याने शिवसैनिकांनी वीज वितरणच्या अधिकाऱयांना जाब विचारत धारेवर धरले. यावेळी आचरा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्यासह पोलीस उपस्थित होते.

 यावेळी मालवण शिवसेना तालुकाप्रमुख बबन शिंदे, नारायण कुबल, शाम घाडी, सतीश प्रभू, दिलीप पराडकर, समीर लब्दे, राजू नार्वेकर, नितीन घाडी आदी उपस्थित हेते. आचरा, चिंदर, त्रिंबक, वायंगणी पंचक्रोशीतील वीज वारंवार खंडित होत आहे. रात्रीच्या वेळेत वीज गायब होण्याचा प्रकार वाढला होता. या प्रकाराने ग्रामस्थ त्रस्त झाले होते. वीज गायब झाल्यावर वीज वितरणचे कर्मचारी हे आपले भ्रमणध्वनी बंद ठेवत असल्याचे शिवसैनिकांनी अधिकाऱयांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी वीजपुरवठा लवकर सुरळीत करावा व आचरा केंद्रात वायरमन वाढविण्याची मागणी करण्यात आली. बुघडे यांनी आचरा केंद्रात आठ वायरमन व पाच अन्य कर्मचारी असून आज 13 जणांची टिम कार्यरत असून लवकरच समस्या दूर करण्याचे आशवासन दिले.

वीजप्रश्नी आचरा व्यापारीही आक्रमक

  वारंवार होणाऱया खंडित वीजपुरवठय़ाने आचरा व्यापारीही त्रस्त झाले होते. आचरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष अभिजित सावंत, जिल्हा परिषद सदस्य जेरोन फर्नांडिस, बाबू परुळेकर, संदीप पांगम, मनोहर वाडेकर, गिरीष माटवकर व अन्य व्यापारीही मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आचरा व्यापाऱयांनी स्वतंत्र विद्युत वाहिनी आचरा बाजारपेठ परिसरात देण्याची मागणी केली. आचरा तिठा ते बाजारपेठेसाठी स्वतंत्र विद्युत वाहिनी देण्याचे वीज वितरणकडून मान्य करण्यात आले.