|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मोफत शिक्षणाचा कायदा करणारे छ. शाहू क्रांतिकारी राजे

मोफत शिक्षणाचा कायदा करणारे छ. शाहू क्रांतिकारी राजे 

प्रतिनिधी/ वाकरे

स्वातंत्र्यपूर्व काळात 1917 मध्ये संस्थानातील प्रजेच्या मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करणारे राजर्षी छत्रपती शाहू हे क्रांतिकारी राजे होते. त्यांच्या कार्याचे परायण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन स. ब. खाडे महाविद्यालयाचे प्रा. एस. पी. चौगले यांनी केले.

सांगरूळ फाटा, कोपार्डे (ता. करवीर) येथील श्रीराम व्होकेशनल ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या राजर्षी शाहू जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. सांगरूळ शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी प्रा. जयंत आसगावकर अध्यक्षस्थानी होते.

प्रा. चौगले यांनी राजर्षी शाहू राजांच्या कारकिर्दीतील अनेक महत्त्वपूर्ण घटना आणि निर्णयांची माहिती देऊन 1902 मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात आरक्षणाचा कायदा करणारे राजर्षी शाहू एकमेव राजे होते, असे सांगितले. स्वतःच्या राज्याभिषेकाचा खर्च राधानगरी धरणासाठी करणारे छत्रपती जनकल्याणासाठी झटणारे राजे होते, असेही ते म्हणाले.

अध्यक्ष प्रा. जयंत आसगावकर यांनी जनता शिक्षित झाली तर संस्थानची सत्ता ताब्यात देईन, असे म्हणणारे शाहू महाराज खऱया अर्थाने रयतेचे राजे होते, असे सांगितले.

प्रास्ताविक प्रा. व्ही. डी. बोगरे यांनी केले. प्रा. चौगले यांनी शाहूंच्या प्रतिमेचे पूजन केले. आभार प्रा. बी. जे. पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा. बी. एन. माळवी, प्रा. व्ही. के. नाळे, प्रा. एस. टी. साळवी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.