|Wednesday, November 14, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » करमणूक कर विभाग आजपासून बंद

करमणूक कर विभाग आजपासून बंद 

प्रतिनिधी/ सांगली

वस्तू व सेवा करामध्ये (जीएसटी) करमणूक कराचा समावेश करण्यात आला आहे. यापुढे हा कर हा जीएसटीअंतर्गत वसूल केला जाणार आहे. त्याच्या वसूलीची जबाबदारी विक्रीकर विभागावर सोपविण्यात आली असल्याने सरकारला कोटय़ावधी रुपयांचा कर वसूल करून देणारा जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर विभाग आता बंद होणार आहे. त्यामुळे या विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱयांचे इतर विभागात समायोजन करण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये करमणूक कर विभागाची स्वतंत्र शाखा आहे. चित्रपटगृहे, केबल ऑपरेटर्स, व्हिडिओ गेम पार्लर, वॉटर पार्क, सर्कस यांच्याकडून नियमित करमणूक कर आकारणी करणे, कर बुडविणाऱयांवर कायदेशीर कारवाई करणे, तसेच केबल ऑपरेटर्सना परवाने देणे, परवान्याचे नूतनीकरणाचे काम या शाखेतून केले जाते. दर्जेदार चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणात करमणूक कर जमा केला जातो. तसेच 31 डिसेंबरच्या रात्रीच्या मनोरंजन कार्यक्रमातून कर वसूल केला जातो. या शाखेला सर्वाधिक महसूल हा केबल ऑपरेटर्सकडून मिळतो. शहरी व ग्रामीण  भागात केबलचे डिजिटायझेशन केल्याने केबल ग्राहकांची संख्या समोर आली आणि त्यातून कराची वसुली वाढली होती. परंतु आता करमणूक कर जीएसटीर्तंगत वसूल केला जाणार आहे. विक्रीकर विभागाला वसुलीची जबाबदारी देण्यात आली आहे. संपूर्ण देशात उद्या शनिवार एक जुलैपासून जीएसटी लागू होत असल्याने या विभागाकडून वसूल करण्यात येत असलेल्या करमणूक कराचे काम थांबणार आहे.

महसूल विभागाच्या वतीने करमणूक, गौण खनिज, जमीन महसूल आदी कर वसूल केले जातात. विभागाच्या वतीने प्रामुख्याने चित्रपटगृहे, व्हिडीओ सिनेमा, केबल, डीटीएच, व्हिडीओ गेम, वॉटर पार्क आदी विविध माध्यमांतून महसूल जमा केला जातो. वेगवेगळ्या कर प्रणालीमुळे महसूलात करमणूक कर विभागाला अनन्यसाधारण महत्व होते. करमणूक कर जमा करण्यासाठी त्यांचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी अनेक घडामोडी होत होत्या. उद्दीष्ट पूर्ण करणे हा विषय चर्चेचा होत होता. केबल नेटवर्कची वसुली, परवाना नुतनीकर यासह अनेक विषय या कार्यालयाकडे असायचे. मात्र देशभर जीएसटी (गुडस् ऍण्ड सर्व्हीस टॅक्स) ची अंमलबजावणी होत आहे. यात करमणूक करा ऐवजी सेवा कर आकारला जाणार आहे. परिणामी करमणूक कर जमा करण्याचे कामच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे महसूलामधील महत्वाचा असा करमणूक कर विभागच बंद होणार आहे. या विभागातील कर्मचारी-अधिकारी यांचे अन्य कोणत्या विभागात समायोजन करण्यात यईल याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. जिह्यातील करमणूक कर विभागात सात अधिकारी-कर्मचारी काम करीत आहेत. या सर्व अधिकारी-कर्मच़ाऱयांना इतर विभागात सहभागी करण्यासाठी त्यांच्या नावाची यादी तयार करण्यात आली असल्याचे समजते.

अद्याप शासन आदेश नाही

राज्यात आज एक जुलै पासून जीएसटी (वस्तू व सेवा कर) लागू होत आहे. विक्रीकर विभागाकडून हा कर आता वसूल करण्यात येणार असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात असलेला करमणूक कर विभागाला काहीच काम असणार नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत असलेला हा विभाग बंद होणार आहे. दरम्यान याबाबत साहाय्यक करमणूक कर अधिकारी कोळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी केवळ कर वसूली बंद करण्यात आल्याचे सांगत याबाबत अजून कोणताही शासन आदेश आला नसल्याचे सांगितले.

Related posts: