|Tuesday, May 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » बेळगावात जीएसटीची कार्यवाही सुरू

बेळगावात जीएसटीची कार्यवाही सुरू 

प्रतिनिधी / बेळगाव

शुक्रवारी मध्यरात्री संसदेत विशेष अधिवेशनातून जीएसटी लागू करण्यात आल्यानंतर संपूर्ण देशभराबरोबरच बेळगावातही त्याची कार्यवाही शनिवारपासून सुरू झाली आहे. सरकारी पातळीवर व्यावसायिक कर आणि व्हॅटची कार्यालये  आता राज्य आणि केंद्रीय जीएसटीमध्ये रुपांतरित झाली आहेत. केंद्रीय अबकारी खात्याचे आता केंद्रीय जीएसटी कार्यालयात रुपांतर झाले आहे. या कार्यालयात जीएसटी दिन साजरा करून अधिकारीवर्गाने ‘एक देश एक कर’ पद्धतीचा अवलंब सुरू केला. नवी करपद्धती लागू झाली आणि तिचा अंमलही थोडय़ाबहुत फरकाने सुरू झाला असला तरी प्रत्यक्षात फिल्डवर व्यापारी आणि ग्राहकांमध्ये बरेच संभ्रम कायम आहेत.

कार्यालयांचे रुपांतर

मालाची विक्री व वाहतूक या व्यवहाराशी संबंधित सेवा कर, व्यापारी कर आणि अबकारी करांचे सारे ओझे जीएसटी या एकाच करावर घालण्यात आले आहे. यामुळे या विभागाशी संबंधित कार्यालयांचे शनिवारपासून जीएसटी कार्यालयांमध्ये रुपांतर करण्यात आले. क्लब रोडवर असलेल्या केंद्रीय सीमा शुल्क आणि अबकारी खात्याचे नामकरण केंद्रीय जीएसटी आयुक्तालय असे करण्यात आले. त्यासाठीचा फलक या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर झळकत आहे.

कर्नाटक सरकारने व्हॅटशी संबंधित वाणिज्य कर खात्याच्या अधिकारीवर्गाला जीएसटीसाठीचे विशेष प्रशिक्षण दिल्यानंतर या कार्यालयाचे रुपांतरही राज्य जीएसटी कार्यालयामध्ये करण्यात आले. यामुळे त्यासाठीची प्रक्रिया दिवसभर सुरू होती. शुक्रवारी मध्यरात्री झालेला बदल शनिवारी नवा असला तरी त्याची पूर्वतयारी मागील वर्षभरापासूनच सुरू राहिल्यामुळे पदांची अदलाबदल आणि कर प्रक्रियेचा नवा सॉफ्टवेअर लागू करण्याकडे अधिकारीवर्गाने विशेष लक्ष पुरविले असल्याचे दिसून आले.

जीएसटी दिन साजरा

नव्याने रुपांतरित झालेल्या केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने जीएसटीच्या पहिल्याच दिवशी आपल्या कार्यालयात जीएसटी दिन साजरा केला. या खात्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी सहभागी झाले होते. शुक्रवारी मध्यरात्रीपासूनच संपूर्ण कार्यालयाला विद्युत रोषणाई करून या नव्या बदलाचे स्वागत करण्यात आले होते. बेळगाव आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱया हुबळी, धारवाड, होस्पेट, विजापूर, बळ्ळारी आणि गुलबर्गा येथील विभागीय कार्यालयांमध्येही जीएसटी दिन साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

नव्या जबाबदारीनुसार बेळगाव विभागाचे आयुक्त बिजॉयकुमार कार, लेखा परीक्षण विभागाचे आयुक्त शिवाजी डांगे, राज्य जीएसटी विभागाचे साहाय्यक आयुक्त मिर्झा अझमत उल्ला व एस. के. महातो आदी अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. आयुक्त बिजॉयकुमार कार यांनी यावेळी बोलताना, व्यापारीवर्गाने आपल्या शंका दूर करून या नव्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. सर्वत्र जीएसटी सेवा केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. रविवारीही ही केंदे सुरू राहणार आहेत. ही एक सोपी कर पद्धती असून त्यात खुलेपणाने सहभागी होण्याची गरज त्यांनी मांडली.

मिर्झा अझमत उल्ला यांनी कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका, तसेच कोणतीही भीती बाळगू नका, असे आवाहन करून व्यापारीवर्गाला मोठा दिलासा दिला.

प्रतिक्रिया

अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर ‘तरुण भारत’ने बाजारपेठेत फेरफटका मारून जीएसटीचे नेमके वातावरण काय? याचा आढावा व्यापारी, ग्राहक व अधिकारी वर्गाच्या प्रतिक्रियांसह घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी संबंधितांनी आपले मन खुले करत जीएसटीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. या प्रतिक्रिया जीएसटीच्या आगमनावेळी निर्माण झालेल्या मानसिक परिस्थितीचे तसेच पुढील काळात व्हाव्या लागणाऱया अंमलबजावणीचे चित्रच दर्शवून जातात.

Related posts: