|Monday, January 21, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » स्पर्धा आणि द्वेष

स्पर्धा आणि द्वेष 

निळोबाराय पातकांच्या यादीतील पुढील पापकर्म सांगतात ते, परद्वेष. हा परद्वेष निर्माण तरी होतो कसा? आपल्या नित्य अनुभवाचा हा विषय आहे. आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे, असे मानले जाते. शिक्षण, सत्ता, संपत्ती, क्रीडा, कला या प्रत्येक क्षेत्राचे झपाटय़ाने व्यापारीकरण होत आहे. प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी जीवघेण्या स्पर्धेला तोंड द्यावे लागते आहे. कारण आपल्या यशापयशाच्या व्याख्या बदलल्या आहेत. तुम्ही तुमच्या निवडलेल्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी असाल तरच यशस्वी. आणि तुम्ही सर्वोच्च स्थानी आहात की नाही हे कोण ठरवणार? पैसा! तुम्ही स्वतःला एकदा बाजारात उभे केलेत की तुमचे मूल्य ठरवणार तो पैसा! या जगात सर्वात जास्त मूल्यवान जर काय समजले जात असेल तर पैसा!

एका जुन्या लोकप्रिय सिने गीताचे बोल आज खरे होऊ पाहताहेत –

ना बाप बडा ना मैया । सबसे बडा रुपैया ।

म्हणून तुमचे शिक्षण तुम्हाला किती पगार मिळवून देते, त्यावर ठरणार तुमच्या शिक्षणाचे मूल्य. मग ते शिक्षण-तुम्हाला विचार करायला शिकवते की नाही? तुम्हाला विवेकी वर्तन करायला शिकवते की नाही? तुम्हाला दया, क्षमा, करुणा, अहिंसा इत्यादी मूल्ये आचरायला शिकवते की नाही? तुम्हाला मैत्री, प्रेम, वात्सल्य, बंधुभाव, त्याग यांच्या वाटेवर नम्रपणे चालायला प्रेरीत करते की नाही? हे सारे प्रश्न निरर्थक आहेत. कारण या साऱया गोष्टींचे मूल्यमापन पैशांच्या बाजारात करता येत नाही. आणि जे पैशात मोजता येत नाही ते सारे अनावश्यक आहे, असे आपल्याला ठासून शिकवले जाते.

कोणत्याही खेळातील खेळापेक्षा क्रिकेटपटू जास्त यशस्वी मानले जातात आणि त्यांना भारतरत्न सन्मानापर्यंत सारे सन्मान दिले जातात, ते का? वास्तविक क्रिकेट हा खेळ जगातील केवळ पंधरा वीस देशात खेळला जात असेल. या खेळातील यश हे एकटय़ाचे नव्हे तर सांघिक असते आणि ते अनेकदा नशिबावरही अवलंबून असते, असे मानले जाते. बुद्धिबळ हा खेळ जगभरातील किमान दीडशे देशातून हजारो खेळाडू खेळतात. या खेळातील यश हे कोणत्याही नशिबावर अवलंबून नसते आणि ते पूर्णपणे वैयक्तिक असते. पण बुद्धिबळातील जगज्जेतेपद अनेकदा मिळवणाऱया खेळाडूला कोणता सन्मान मिळतो? असे का होते? कारण क्रिकेटमध्ये पैसा आहे.

जिथे पैसा आहे तिथेच यश आहे हे एकदा स्वीकारले की बाजाराचे सारे नियम त्या क्षेत्राला लागू होतात. मग स्पर्धा, भ्रष्टाचार, खोटेपणा सारे काही आले. बाजार तुम्हाला स्पर्धेत धावायला भाग पाडतो. कित्येकवेळा तुम्ही कशासाठी आणि कुणासाठी स्पर्धेत धावत आहात हेच तुम्हाला कळेनासे होते. स्पर्धेतून ईर्षा वाढत जाते. कसेही करून आणि काहीही करून जिंकायलाच हवे. मग आपल्या महत्त्वाकांक्षेच्या रथाच्या चाकाखाली कुणी का भरडले जाईना. या स्पर्धेतूनच जन्म घेतात मत्सर आणि द्वेष ही जुळी भावंडे!

Related posts: